राज्यात पुन्हा अवकाळीची ‘वक्र’वृष्टी, केंद्राचा मदतीचा आखडता हात पण राज्य सरकारची प्रत्येकाला मदत : सामना
केंद्राचा 'आखडता हात' राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसला तरी राज्य सरकारच्या मदतीचा हात प्रत्येक अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतोच, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.
मुंबई : कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी अशा दुष्टचक्रात महाराष्ट्रातील शेती सापडली आहे. दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळीची ‘वक्र’वृष्टी होत आहे. केंद्राचा ‘आखडता हात’ राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसला तरी राज्य सरकारच्या मदतीचा हात प्रत्येक अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतोच, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय. (Shivsena Saamana Editorial Slam Modi Govt)
कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी अशा दुष्टचक्रात महाराष्ट्रातील शेती सापडली आहे. निसर्गाची लहर कशी थोपविणार हा प्रश्न शेवटी उरतोच. पर्जन्यराजा हा शेतकऱ्याचा मायबाप, पण तोच अवकाळीची ‘कुऱ्हाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे? असंह सामनामध्ये म्हटलंय.
कोकणापासून विदर्भापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र अवकाळी
अवकाळी पाऊस आणि लहरी हवामान महाराष्ट्राची पाठ सोडायला तयार नाही. दर दोन-अडीच महिन्याने निसर्गाच्या लहरीचा तडाखा राज्यातील शेतकऱयाला बसतो. त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतो. गेल्याच महिन्यात अवकाळी पावसाने राज्याला दणका दिला होता. आता परत सर्वत्र अवचित पावसाने हजेरी लावल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर गारपिटीचाही तडाखा बसला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी
विदर्भात नागपूरसह बुलढाणा, वाशीम, अकोला, गोंदिया, भंडारा या जिल्हय़ांत मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने भाजीपाल्यासह कडधान्य पिकाचेही नुकसान झाले आहे. त्याशिवाय रब्बी हंगामाचे मुख्य पीक असलेल्या गव्हालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भातील शेतकऱयाच्या मागील खरीप हंगामावर मावा-तुडतुडे वगैरे रोगाने हल्ला केला होता. त्यामुळे बळीराजाच्या हाती अर्धे पिकदेखील आले नव्हते. खरीपाची उणीव रब्बीमध्ये भरून काढू अशी आस शेतकरी लावून होता, पण त्याच्या या आशेवर पाणी फेरले गेले आहे.
शेतकऱ्यांच्या काळजीत भर
‘संत्रा गळाला आणि गहू झोपला’ अशी स्थिती येथील शेतीची झाली आहे. कापसाची बोंडे भिजल्याने त्याचे काय करायचे ही चिंता कापूस उत्पादकांना भेडसावीत आहे. मराठवाडा, प. महाराष्ट्र आणि कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली. कोकणातही यापेक्षा वेगळे घडलेले नाही. त्यामुळे प. महाराष्ट्र आणि कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे. अशा पावसाने कोकणातील आंबा तसेच काजू, कोकम पीक धोक्यात आणले होते. आता दुसऱ्यांदा पावसाचा तडाखा बसल्याने कसेबसे वाचलेले पीक हातातून जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटणे साहजिक आहे.
‘पावसाचा तेरावा महिना’ अशी नवीन म्हण रूढ होण्याची भीती
कधी अतिवृष्टी, कधी महापूर, कधी चक्रीवादळ, तर कधी अवकाळी अशा दुष्टचक्रात महाराष्ट्रातील शेती गेल्या काही वर्षांपासून सापडली आहे. मागील वर्षात काय किंवा आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला काय, निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव महाराष्ट्राला सातत्याने येत आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी म्हण आहे, पण अलीकडील काळात राज्यासाठी ‘पावसाचा तेरावा महिना’ अशी नवीन म्हण रूढ होण्याची भीती आहे. त्याची कारणे काय असतील ती असतील, पण शेवटी उद्ध्वस्त होतो तो सामान्य शेतकरीच…
(Shivsena Saamana Editorial Slam Modi Govt)
हे ही वाचा :
…तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अॅक्शन मोडमध्ये