खुर्चीमागच्या ‘मुख्यमंत्री बोर्ड’वर श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादीच्या वतीने ट्विट करण्यात आला होता. आता यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा एक फोटो राष्ट्रवादीकडून (NCP) ट्विट करण्यात आला होता. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या (CM) खुर्चीवर बसले आहेत, असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला होता. मात्र आता यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी खासदार आहे, कुठे बसायचं आणि कुठे नाही हे मला कळतं. हे घरचं ऑफीस आहे, मी ज्या खुर्चीवर बसलो आहे ती माझीच खुर्ची आहे. मात्र माझ्या मागे जो बोर्ड दिसत आहे तो तीथला नाही. माझ्या मागे बोर्ड होता याची मला कल्पना देखील नव्हती, असं स्पष्टीकरण आता श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादीचा आरोप काय?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे याचा एक फोटो ट्विट केला होता. त्या फोटोमध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत रविकांत वरपे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.
‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूये. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’. असा घणाघात वरपे यांनी केला होता.
यापूर्वीही टीका
दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावाचेच मुख्यमंत्री आहेत. सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आणि आता श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्विट करत विरोधकांकडून पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.