Sindhudurg District Bank | निवडणूक जिंकली पण अध्यक्षपदी कोण ? जिल्हा बँकेचा कारभार विठ्ठल देसाईंकडे ? भाजपचे अनेक नेते रांगेत
भाजपने निवडणूक जिंकली असली तरी अजून येथे बँकेच्या संचालकपदाची कोणाची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या 13 जानेवारीला निवडणूक होणार आहे. भाजपचे अनेक नेते यासाठी उत्सूक असून नारायण राणे बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सिंधुदुर्ग : राणे कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर भाजपने जिंकली. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकूण 19 जागांपैकी 11 जागा खिशात घातल्या. भाजपने निवडणूक जिंकली असली तरी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे अजून स्पष्ट झालेले आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या 13 जानेवारीला निवडणूक होणार आहे. भाजपचे अनेक नेते यासाठी उत्सूक असून नारायण राणे बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्यातरी विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.
अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई तिघांची नावे चर्चेत
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पड़ते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्यातरी सतीश सावंत यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का देत निवडून आलेले विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. मात्र बँकचा अध्यक्ष कोण होणार हे मात्र 13 जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे.
भाजपने 11 जागा जिंकत निवडणूक जिंकली
31 डिसेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारली. येथे एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय झाला. तर महाविकास आघाडीला फक्त 8 जागा जिंकता आल्या. काही जागांवर अतिशय अटितटीची निवडणूक झाली. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभव पत्करावा लागला.
इतर बातम्या :
लग्नाआधीच आक्रित! नदीत सेल्फी घेताना मुंबईकर महिला बुडाल्या; सासूचा मृत्यू, होणाऱ्या सूनबाई बेपत्ता
Happy Birthday Yash | मुलगा सुपरस्टार, कोट्यावधी कमावतो, तरीही यशचे वडील करतात ड्रायव्हरचे काम!