राणेंचा बंगला, फडणवीसांची उपस्थिती, शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये
मालवणमधील नारायण राणे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव चव्हाण यांचा भाजपप्रवेश झाला
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते. (Sindhudurg NCP Leader Gulabrao Chavan enters BJP)
गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गमधील स्थानिक नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…
मालवणमधील नारायण राणे यांच्या ‘नीलरत्न’ निवासस्थानी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुलाबराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांच्यासह पुत्र आणि आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड ही भाजपची नेते मंडळीही उपस्थित होती.
कोण आहेत गुलाबराव चव्हाण?
गुलाबराव चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामधलं मोठं नाव आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आदर्श मानणारे गुलाबराव चव्हाण, हे पवारांचे खंदे समर्थक. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दरम्यान, काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी आज सकाळीच ट्विटरवरुन दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचा स्थानिक नेता भाजपमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे. (Sindhudurg NCP Leader Gulabrao Chavan enters BJP)