योद्धा कुणाला म्हणावं याचीही काही व्याख्या असते, त्यालाही वय असतं!; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा शरद पवार यांच्यावर निशाणा
Narayan Rane on Sharad Pawar : योद्ध्यालाही वय असतं, कुणालाही उपमा देऊ नये; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा शरद पवार यांच्यावर निशाणा
सिंधुदुर्ग : अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाराजी दर्शवत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीवेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांचं वय झालंय. आता त्यांनी आराम करावा आणि इतरांच्या हातात कारभार द्यावा, असं त्यांनी म्हटलं. पण त्याचवेळी शरद पवार पुन्हा नव्या जोमाने सक्रीय झाले. ते महाराष्ट्र दौराही करणार आहेत. त्यामुळे 80 वर्षांचा योद्धा म्हणत शरद पवार यांच्या या उत्साहाचं राष्ट्रवादीचे समर्थक कौतुक करत आहे.
आता मात्र शरद पवार यांना देण्यात आलेल्या योद्धा या शब्दावरच टीका करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“योद्ध्यालाही वय असतं”
योद्धा कोणाला म्हणावं? याचीही काही व्याख्या आहे. आर्मीत घेताना 82 वर्षाच्या योद्ध्याला घेत नाहीत. योध्याला वय असतं. मला वाटतं मी योद्धा आहे, धावणं, फिरणं गतीने काम करणं. मला त्यांच्या वयावर बोलायचे नाही पण ते जी तुलना करत आहेत. त्याला काही अर्थ नाही. राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत. मोठा भाग 40 आमदारांपेक्षा जास्तीचा गट भाजप सरकारसोबत आलेला आहे. त्यामुळे सरकार मजबूत झालेलं आहे,असं राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावरही नारायण राणे यांनी टीका केली आहे. हे दौरे काही कामाचे नाहीत. फक्त मी फिरतोय हे दाखवायला सगळं चालू आहे. याच्या पक्षात कोण राहिलंय का? हा फक्त बोलतो. बेसलेस बोलतो. याच्या बोलण्याला काही अर्थ नाही. स्वत:ला सांभाळता येत नाही. दुसऱ्याने पक्ष फोडला मग का बोंबलतायेत. हे दौरे काही कामाचे नाहीत, असं नारायण राणे म्हणालेत.
अजित पवार तेव्हा कुठे होते राष्ट्रवादीत असताना विरोधीपक्ष नेते होते. तेव्हा त्यांनी तिकडे बुडवलं का? आणि भाजप बुडवून घेणाऱ्यांपैकी नाही. उलट संजय राऊतला कधी बुडवता येईल याची वाट पाहत आहोत, असा टोला नारायण राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना लगावला.
राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. मी त्यावर भाष्य करणार नाही. मात्र या मंत्री मंडळात आमच्या आमदारांना स्थान मिळावं अशी अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं आहे.