Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची पहिल्या ठाकरेंनी घेतली भेट, स्मिता ठाकरे म्हणतात मी त्यांना…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज स्मिता ठाकरे यांनी भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीनंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचा बंड झाल्यापासून आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ठाकरे आणि त्यांच्यातला संवाद हा तुटला आहे. मात्र त्यात फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Tackeray) आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे. मध्येच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार असल्याच्या बातम्याही आल्या. मात्र तसं काही घडलं नाही. त्यानंतर त्या राजकीय चर्चांनाही पूर्णविराम मिळाला. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया वरून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आता ठाकरे घराण्यातल्या पहिल्या व्यक्तीने त्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांनी भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीनंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे.
कोण आहेत स्मिता ठाकरे?
स्मिता ठाकरे कोण आहेत, त्यावरतीही एक नजर टाकूया…स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आहेत. त्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. तसेच काही चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे. त्यांचं व्यावसायिक करिअर हे चित्रपटांशी निगडित राहिलेलं आहे. मात्र आता त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भेटीनंतर काय म्हणाल्या स्मिता ठाकरे?
सह्याद्री अतिथिगृही झालेल्या या भेटीनंतर त्यांची पहिली प्रतिक्रियाही आली आहे. मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. आज एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत. त्याचा आदर मी करते. त्यांचं कामही मला माहिती आहे. त्यांनी शिवसेनेत खूप काम केलं आहे. मी त्यांना खूप आदराने बघते. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी कुटुंब वगैरे काही पाहिलं नाही, एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
पाहा व्हिडिओ
भेटीनंतर राजकीय समीकरणं बदलणार?
एकीकडे उद्धव ठाकरे हे आपल्या मुलाखतीमधून एकनाथ शिंदे यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत. गद्दार, बंडखोर, यांची हाव संपत नाही, यांना कितीही दिलं तरी कमी पडतं, असे म्हणून सतत टिकेचे बाण सोडत आहेत. तर दुसरीकडे स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तर राज ठाकरे हेही एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अतिशय मवाळ आणि सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी काळातली राजकीय समीकरणात बदलू शकतात, असा अंदाजाने राजकीय पंडितांकडून वर्तवण्यात येत आहे.