Video : पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण? जोरदार राडा, राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं.
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. त्यावेळी इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा (Chaos) पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी (Sloganeering) करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं. मात्र, घोषणाबाजी केल्यानंतर आपल्याला भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
दुपारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केलं. त्यानंतर संध्याकाळी स्मृती इराणी बालगंधर्व रंगमंदिरात दाखल झाल्या. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदिश मुळिक यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरुवात होताच वरच्या लॉबीत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला. घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि बालगंधर्व रंगमंदिरातून बाहेर नेण्यात आलं. मात्र, त्यात वेळी एका भाजप कार्यकर्त्याने त्यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय. महत्वाची बाब म्हणजे माध्यमांच्या कॅमेरात एक भाजप कार्यकर्ता मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं कैद झालं आहे.
इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान, आज सकाळपासूनच इराणी यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. इतकंच नाही तर काही कार्यकर्त्यांनी इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने
स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. त्यासाठी स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आलं. तर त्याच परिसरातून भाजपचे कार्यकर्तेही मोदी मोदीच्या घोषणा देत बालगंधर्व रंगमंदिराकडे चालत गेले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.