स्पेशल रिपोर्ट: राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीचा अर्थ काय?
भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय (Meeting of BJP leaders with Raj Thackeray).
मुंबई : राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची कास धरल्याने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय (Meeting of BJP leaders with Raj Thackeray). या वाढत्या भेटींमुळे 9 फेब्रुवारीच्या मनसेच्या मोर्चाला भाजप छुप्या पद्धतीने सहकार्य करणार असल्याची चर्चा सुरु झालीय.
मनसेने पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुंबईत अधिवेशन घेतलं. त्यात पक्षाला नव्या झेंड्यासोबतच कडव्या हिंदुत्वाच्या विचारांची नवी जोडही दिली आहे. त्यानंतर मनसे पुन्हा एकदा 9 फेब्रुवारीला शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेतेही राज ठाकरेंच्या भेटी घेत असल्याने या मोर्चासाठीच काही खलबतं होत आहेत की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. महाअधिवेशनात पक्षाने कात टाकलीय असून पक्षाचा झेंडा आणि अजेंडा सुद्धा बदललाय. मराठी अस्मितेवरून मनसेची आता प्रखर हिंदुत्वाकडे राजकीय वाटचाल सुरु झालीय. त्यामुळे शिवसेनेशी जवळपास 30 वर्षांचा संसार मोडलेल्या भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेला टोकाचा संघर्ष विसरुन राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढूल्या आहेत.
साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. बुधवारी (29 जानेवारी) सायंकाळी भाजप आमदार आशिष शेलारही राज ठाकरेंना कृष्णकुंजवर भेटले. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. भाजप नेत्यांच्या या दोन्ही भेटी पूर्णपणे राजकीय विषयांवर असल्याचे सांगितले जाते. CAA आणि NRC या कायद्यांवरून देशात समर्थन आणि विरोध अशा दोन्ही बाजूने रान पेटलं आहे. असं असताना महाराष्ट्रात मनसेनं बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना हकलण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणं भाजपच्या पथ्यावर पडलं आहे. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मर्यादा आल्या आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीचा CAA आणि NRC कायद्याला विरोध असल्याने शिवसेनेची कोंडी झालीय. अशा वातावरणात राज्यात सध्या भाजप-मनसे थेट युतीची चिन्हं दिसत नसली, तरी एकमेकांना सोयीची जवळीक मात्र वाढतेय. भाजप-मनसेत नव्याने सलगीचं राजकारण सुरु झाल्यानं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळं शिवसेनेनं ‘जय श्रीराम’ची घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीची पुन्हा आखणी सुरु केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार किमान कार्यक्रमांवर चालवणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाटचाल सुरु ठेवणं अशी दुहेरी कसरत उद्धव ठाकरेंना यापुढे अनेकदा करावी लागणार आहे.
व्हिडीओ: