ST Andolan Mumbai : शरद पवारांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, अॅड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात
संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन कठोर कारवाईचा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचा लढा कोर्टात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : मागील पाच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Agitation) आज वेगळं वळण मिळालं. जवळपास 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आंदोलन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडफेकही झाली. या प्रकारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन कठोर कारवाईचा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचा लढा कोर्टात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
सदावर्तेंच्या पत्नीचा पवारांवर गंभीर आरोप
दरम्यान, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे यांच्याकडून माझ्या पतीच्या जीविताला धोका असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केलाय. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जयश्री पाटील गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी पवार आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सदावर्तेंची प्रतिक्रिया काय?
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. परंतु तुम्हाला सांगतो की केसचा निकाल लागल्यानंतर विपश्यना करा, शांतता राखा, मनस्थिती शांत ठेवा, असं मी आणि न्यायमूर्तींनीही सांगितलं. व्यथित झालेल्या महिलांचा तुम्ही हल्ला हल्ला म्हणून बोलू नका. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे तर गुलामगिरीतून बाहेर येण्याचं लक्षण आहे. कोविड काळात वीर मरण पत्करलेल्या विधवा झालेल्या महिलांसाठी कोर्टात उभं करणं मी हल्ला करण्यासाठी उभा राहीन का? असा सवाल सदावर्ते यांनी विचारलाय.
‘हे राष्ट्रवादीकडूनही केलं गेलं असेल’
संवंधिनिक मर्यादा आम्ही ओलांडलेली नाही. संविधानाच्या बाहेर आम्ही एकही शब्द बोललेलो नाही. एक शब्द तुम्ही वापरला की ड्रामा.. ड्राम्याला हल्ल्याचं स्वरुप देऊ नये. 124 विधवा झालेल्या भगिनी, लोकांच्या प्रती त्यांना तुम्ही हल्लेखोर ठरवू नका. चौकशी आधी फाशीची प्रथा कुठेच नाही. सुप्रिया सुळेच म्हणतात की मी चर्चा करायला तयार आहे, तर मग संवादातून आक्रमकता झाली असेल त्याला तुम्ही हल्ला कसं म्हणता? असंही सदावर्तेंनी विचारलंय. हा हल्ला नाही, याला हल्ल्याचं रुप दिलं जातंय. हायवोल्टेज ड्रामा तयार करुन राष्ट्रवादीकडूनही केलं जाण्याचा प्रकार असू शकतो, अशी शंकाही सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या :