Breaking : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता, शरद पवारांच्या अनिल परबांना कोणत्या महत्वाच्या सूचना?
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल चार ते साडे चार तास खलबतं झाली. त्यावेळी शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनिल परब यांना महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती आज समोर आलीय.
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास महिनाभरापासून सुरुच आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो एसटी कर्मचारी मागील 14 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल चार ते साडे चार तास खलबतं झाली. त्यावेळी शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनिल परब यांना महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती आज समोर आलीय. (Important instructions from Sharad Pawar to Anil Parab regarding the strike of ST employees)
शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन आणि सुविधा आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि सुविधा देण्याबाबतीत समान स्तरावर असल्याचं समोर आलं. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, अशी सूचना पवार यांनी परबांना दिल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्यावी, असा सल्ला पवारांनी दिल्याचं कळतंय.
शरद पवारांच्या नेमक्या सूचना काय?
>> एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्या
>> पगारवाढ देताना अगदी कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा
>> पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो आर्थिक ताण पडेल, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी वर्षभराची तरतूद करावी
>> आर्थिक भार सोसावा लागेल तरी चालेल पण भरघोस पगारवाढ द्या
एसटी संपावरुन संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, कालच्या महत्वाच्या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि पवार यांच्यातही विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात एसटी कर्मचारी संपाचाही मुद्दा होता, अशी माहिती राऊतांनी दिली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतंय आणि का भडकवतंय त्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण, का करतंय यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. जे जे त्यांच्यासाठी करता येणं शक्य आहे ते सरकार करत आहे. कालच शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांनी चर्चाही केली आहे. मला आजच्या पवारसाहेबांसोबतच्या बैठकीतून असं समजलं की त्यांनी काही सकारात्मक सूचना दिलेल्या आहेत’, अशी माहिती राऊत यांनी दिली.
इतर बातम्या :
Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा
‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?
Important instructions from Sharad Pawar to Anil Parab regarding the strike of ST employees