‘पवार म्हणाले मध्यममार्ग काढा, पण पवारांचा मध्यमार्ग पूर्वेला, दक्षिणेला की उत्तरेला?’ सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल
राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं त्यांच्या अधिवेशनात सांगता मग त्या कामगारांचे अश्रू पवारसाहेबांना का दिसले नाहीत? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय. तसंच पवार साहेब पावसात भिजले, पण आज एसटी कर्मचारी पवासात भिजतोय, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम पवारसाहेब करत नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचा टोलाही खोत यांनी लगावलाय.
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसोबत मागील 10 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. आमदार पडळकर आणि आमदार खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Sadabhau Khot criticizes Sharad Pawar on the issue of ST employees)
सदाभाऊ खोतांचा पवारांवर निशाणा
पवार साहेब जे म्हणत आहे की मध्य मार्ग काढू, तर आम्ही तरी कुठे म्हणतोय की आडवळणानं जाऊ. मध्यम मार्ग काय आहे तो पवारसाहेब तुम्ही सांगा. ते अभ्यासू व्यक्ती आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नेमचा त्यांचा मध्य पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आलं नाही. मला वाटतं की राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं त्यांच्या अधिवेशनात सांगता मग त्या कामगारांचे अश्रू पवारसाहेबांना का दिसले नाहीत? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय. तसंच पवार साहेब पावसात भिजले, पण आज एसटी कर्मचारी पवासात भिजतोय, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम पवारसाहेब करत नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैवं असल्याचा टोलाही खोत यांनी लगावलाय.
‘पवारांनीच 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला’
तर ‘शरद पवार यांनीच खऱ्या अर्थाने मागील 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला. त्यांची एकमेव संघटना मान्यताप्राप्त आहे. मात्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त संघटनेशीच चर्चा करतं. मात्र आजपर्यंत पवारांच्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न राज्य सरकारसमोर कधी मांडेलच नाहीत. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटनांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केल्याचा घणाघात पडळकर यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार जर 2050 पर्यंत राहिले तर तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातही ते 1980 आणि 2020 मधल्या भाषणातील मुद्देच सांगतील. जर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले तर त्यांची संघटना उरणार नाही. निवडणुकीवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करता येणार नाही’, असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. त्याचबरोबर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यावर आझाद मैदान सोडणार नाही, असंही पडळकर यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं.
फडणवीसांच्या सूचनांवर विचार करु- परब
दरम्यान, पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांची भेट घेण्यापूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अद्याप संपलेला नाही. कर्मचाऱ्यांना सकाळी पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टानं नेमलेली कमिटीच निर्णय घेईल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी राज्याचा कारभार हाकला आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत काही सूचना केल्या आहेत. फडणवीसांच्या सूचनांवर आम्ही विचार करु, असं अनिल परब म्हणाले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही परब म्हणाले.
इतर बातम्या :
Sadabhau Khot criticizes Sharad Pawar on the issue of ST employees