Sharad Pawar : सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत ठरेल, तिथे सरकार बहुमतात असेल, शरद पवारांना विश्वास
सरकार बहुमतात आहे का नाही हे विधानसभेत सिद्ध होईल. विधानसभेत फ्लोअर टेस्ट केल्यावर कळेल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. काही गोष्टी झाल्या त्या नाकारता येणार नाहीत. जे आमदार बाहेर नेण्यात आले ते मुंबईत आल्यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही पवार म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केले. अडीच वर्ष सरकारने उत्तम काम केले. कोरोना काळात सरकारने चांगेल काम केले. यामुळे हे सरकार विधान भवनात बहुमतात (Majority) असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच मविआ सरकार टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करु. सरकार बहुमतात आहे का नाही हे विधानसभे (Vidhan Sabha)त सिद्ध होईल. विधानसभेत फ्लोअर टेस्ट केल्यावर कळेल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. काही गोष्टी झाल्या त्या नाकारता येणार नाहीत. जे आमदार बाहेर नेण्यात आले ते मुंबईत आल्यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही पवार म्हणाले.
अशी स्थिती अनेकदा पाहिली आहे. त्यातून मात करून हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे, हे संबंध देशाला कळेल. जे लोक तिथे गेले. तिथल्या नेत्याचं म्हणणं आहे, आघाडीत आम्ही गेलो. काँग्रेस राष्ट्रवादीविरोधात नाराजी आहे. त्यावर राऊत यांनी सांगितलं. तुम्हाला हेच सांगायचं असेल तर इथे येऊन सांगा. आम्ही तुमचं ऐकू आघाडीतून बाहेर पडू. आसाममध्ये बसून सांगू नका, असं राऊत म्हणाले. हेच काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
या सगळ्यात भाजपचा हात, पवारांचा अप्रत्यक्ष दावा
शिंदेंची एक मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हटलंय. माझ्याकडे देशातील सर्व पक्षाची यादी आहे. त्यात देशात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, मायावती, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी ही अधिकृत यादी आहे. आता तुम्हीच सांगा सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादीचा यात हात आहे का ? मग जे नाहीत त्याचा तुम्ही विचार केला तर आहेत कोण हे सांगावं लागत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सुरत आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक दिसले, ते अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असं वाटत नाही. पण माझ्या परिचयाचे आहेत. सुरतला भाजपचे राज्य अध्यक्ष पाटील मराठी गृहस्थ आहेत. ते पार्लमेंटरी मेंबर आहे. त्यांचा सहभाग असेल तर अर्थ काय सांगायचा. आसाममध्ये राज्य सरकार व्यवस्था करण्यात अॅक्टिव्ह आहे. तिथलं राज्य भाजपच्या हातात आहे. त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट होते. कोण आहे नाही हे सांगायची गरज नाही. नाव घेण्याची गरज नाही. (Statement of NCP President Sharad Pawar at the press conference regarding majority)