‘ठाकरे मुंबई महापालिका हरले नाहीत तर राजकारन सोडेन’, सुधीर मुनगंटीवारांचा दावा; उद्धव ठाकरेंनी सूडाचं राजकारण केल्याचा आरोप
ठाकरे मुंबई महापालिका हरले नाहीत तर राजकारण सोडेन, असा दावाच मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच नवनीत राणा, कंगना राणावतचं उदाहरण देत उद्धव ठाकरे यांनी असंख्य लोकांचा सूड घेतल्याचा गंभीर आरोपही मुनगंटीवार यांनी केलाय.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर अगदी शेलक्या शब्दात त्यांनी भाजप नेत्यांवरही टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे मुंबई महापालिका हरणार, ठाकरे मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) हरले नाहीत तर राजकारण सोडेन, असा दावाच मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच नवनीत राणा, कंगना राणावतचं उदाहरण देत उद्धव ठाकरे यांनी असंख्य लोकांचा सूड घेतल्याचा गंभीर आरोपही मुनगंटीवार यांनी केलाय.
‘..तर राजकारण सोडेन’
सहज, सुलभ प्रश्न विचारत ही कौटुंबिक मुलाखत घेतली. खासदार नवनीत राणा यांनीही तर घोषित केलं होतं की मी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार नाही. त्यांनी लेखीही दिलं होतं. तरीही 14 दिवस तुम्ही त्यांना तुरुंगात टाकून आमच्या हाती सत्ता आहे, सत्तेचा अहंकार आहे. आम्ही कुणाचाही बदला चुकवू शकतो, ही भावना तुम्ही व्यक्त करत होता. कंगना रणावत असे असंख्य सूड घेण्याचे प्रकार पाहिले. तुम्ही येता जाता खंजीर खंजीर खंजीर या शब्दाचा उपयोग करता. देव करो पुढचं बोदचिन्ह तुम्हाला खंजीरच प्राप्त होवो, असा टोला मुनगंटीवार यांनी ठाकरेंना लगावलाय. तसंच ठाकरे अशा मुलाखतींमुळे मुंबई महापालिका हरणार. ठाकरे मुंबई महापालिका हरले नाहीत तर राजकारण सोडेन, असा दावाच सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच उद्धव ठाकरे यांच्या समजूतदार मुलाखती अनुभवायच्या असतील तर मुंबईत त्यांचा एकदा पराभव करा, तरंच ही शब्दरचना बदलेल, असा आवाहनच मुनगंटीवार यांनी जनतेला केलंय.
‘बाळासाहेबांचा फोटो खासगी मालमत्ता नाही’
बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो एक विचार म्हणून लावतो. बाळासाहेबांचा फोटो खासगी मालमत्ता नाही. जर उद्धव ठाकरे म्हणतात तसं असेल तर बाळासाहेब सामान्य शिवसैनिकांचेही पिता नव्हते, तर त्यांनी बाळासाहेबांचा फोटो का लावावा? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो केवळ उदयनराजे आणि शाहू महारांचा फोटो त्यांच्या वंशजांनीच वापरावा का? असा सवालही मुनगंटीवार यांनी केलाय.
‘..तर भुजबळ, राऊत, परब, राज ठाकरेही भाजपमध्ये दिसले असते’
ईडीच्या दबावामुळे नेते भाजपमध्ये जात असल्याचा आरोप केला जातोय. त्याबाबत विचारलं असता, ईडीच्या दबावामुळे नेत्यांचा भाजप प्रवेश होत असेल तर भुजबळ, राऊत, राज ठाकरे, अनिल परब हे देखील भाजपमध्ये दिसले असते. स्वत:ला पराक्रमी समजत अन्य सर्वांना सामान्य बनवण्याचे चित्र रंगवले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्याने कधी काळी पवारांना पितामह भिष्म संबोधलं होतं. आता कौरवांची बाजू सोडून अर्जुन खोतकर शिंदे गटात येत असतील तर ते पांडवांकडे येत आहेत, असा टोलाही मुनगंटीवार यांनी ठाकरे आणि संजय राऊतांना लगावलाय.