Sudhir Mungantiwar : ‘जैसे करम केले तैसे फळ देईल आमदार’, सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला; विधान परिषद निवडणुकीत विजयाचा दावा
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. '24 ऑक्टोबर 2019 रोजी आमच्याशी धोका झाला. मतदारांशी गद्दारी केली. आता जैसे करम केले तैसे फळ देईल आमदार', असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय.
नागपूर : राज्यसभा निवडणुकीपाठापोठ राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु आहे. सोमवारी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे अधिक रंगत पाहायला मिळतेय. अशावेळी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपकडूनही विजयाचा दावा केला जातोय. इतकंच नाही तर कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी आणि भाजपनंही आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. अशावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. ’24 ऑक्टोबर 2019 रोजी आमच्याशी धोका झाला. मतदारांशी गद्दारी केली. आता जैसे करम केले तैसे फळ देईल आमदार’, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही चमत्कारासाठी नाही तर विजयासाठी निवडणूक लढत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेला तीन उमेदवार दिले आणि आमदारांनीही सदसदविवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधान परिषदेतही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवारी उभा केलेला नाही. तर अतिशय नियोजनपूर्वक आम्ही निवडणुकीची तयारी केली आहे. आम्हाला विजयाचा विश्वास आहे, असा दावाही मुनगंटीवार यांनी केलाय.
‘जैसे करम केले तैसे फळ देईल आमदार’
24 ऑक्टोबर 2019 रोजी आमच्याशी धोका झाला. मतदारांशी गद्दारी केली. आता जैसे करम केले तैसे फळ देईल आमदार. ज्यांनी मतदारांशी विश्वासघात केला, गद्दारी केली, आता तेच लोक आमदारांसंदर्भात गद्दारी आणि धोका केल्याची गोष्ट सांगत आहेत. हे जगातील आठवे आश्चर्य आहे. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नाही असं म्हणत असतील तर त्यांचं काही चुकलं नाही. जनतेनं त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिलं आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावलाय.
‘1966 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं भाषण एकदा ऐकावं’
शिवसेनेच्या सर्व आमदारांना माझं आवाहन आहे की त्यांनी 1966 रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं भाषण एकदा ऐकावं. शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करु शकत नाही. ज्यांना खुर्चीचा मोह आहे, जे बाळासाहेबांचे विचार विसरले असतील तरे मात्र मतदान करणार नाहीत, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
संजय राऊतांना जोरदार टोला
मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवरही टीका केलीय. आमदारांच्या सदसदविवेकबुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणणं, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा म्हणणं, पाप केल्यानं कोरोना होतो असं म्हणणं, भाजप जिंकली असली तरी त्यांचा विजय झाला नाही असं म्हणणं या सर्व वक्तव्याबाबत हजारो वर्षाच्या संशोधनानंतर उत्तर सापडेल, असा टोला मुंनगंटीवारांनी संजय राऊतांना लगावलाय.