…म्हणून तुम्हाला शिवसेनेच्या दरवाजात जावं लागलं, मुनगंटीवारांचा अजित पवारांवर पलटवार
सत्तेचा ताम्रपट हातातून जाऊ नये म्हणून अजित दादा भाजपसोबत आले आणि तोच ताम्रपट घेऊन ते शिवसेनेच्या दरवाजात गेले, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवारांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
चंद्रपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केलेल्या टीकेला मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले आहे (Mungantiwar Reply To Ajit Pawar). सत्तेचा ताम्रपट हातातून जाऊ नये म्हणून अजित दादा भाजपसोबत आले आणि तोच ताम्रपट घेऊन ते शिवसेनेच्या दरवाजात गेले, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवारांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात सत्तेच्या ताम्रपटावरुन वातावरण चांगलच तापलं आहे (Mungantiwar Reply To Ajit Pawar).
“सत्तेचा ताम्रपट हा स्थायी आहे, अमर आहे असं समजून कोणी वागू नये, असं अजित पवार म्हणत असतील. तर ते खरं आहे. हे निरंतर सत्य आहे. दिवस आहे तर रात्रही येणार, सूर्योदय होतो तसा सूर्यास्तही होतो. त्यामुळे आता अजित दादांनी असा उल्लेख करण्याची गरज नव्हती”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“अजित दादा 22 च्या रात्री (22 नोव्हेंबर) हा ताम्रपट आपल्या हातून जाऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्यासोबत 36 तासांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. हिंदू धर्मामध्ये मी अशा अनेकांबद्दल ऐकलं आहे जे चिरंजीव आहेत. मात्र, राजकारणातही काही लोक सत्तेमध्ये आपण चिरंजीव राहावं, मग पक्ष कुठलाही निवडून येऊ दे पण आपण मात्र सत्तेत राहावं यासाठी प्रयत्न करतात. हा सत्तेचा ताम्रपट आपल्याकडे राहावा त्यासाठी अजित दादा प्रयत्न करत होते.”
“आता काकांनी आपला जुना डाव टाकला, म्हणून त्यांना सत्तेचा ताम्रपट आमच्याकडून घेवून शिवसेनेच्या दरवाज्यात जावं लागलं. आम्ही कधीही ताम्रपट आमच्या हातात आहे, असं मानलं नाही. जनतेचा आशीर्वाद घेऊन नेहमी जनतेच्या हितासाठी सत्ता राबवण्याचा प्रयत्न आमच्या पक्षातर्फे झाला. व्यक्तिगत माझ्या हातून हाच प्रयत्न होत राहिला आणि होत राहील.”
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरुन सुधीर मुनगंटीवार पक्षावर नाराज असल्याचंही म्हटलं जात होतं. त्यावरही मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“भाजप अधिवेशन सुरु असण्याच्या काळात माझ्या काही पूर्वनियोजित बैठका आणि भेटी असल्याने मी अनुमती घेऊनच मतदारसंघात आहे. हा पक्ष आमचा आत्मा आहे. त्यामुळे पक्षाबाबत नाराज असण्याचे कारण नाही. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपण कधीच नव्हतो. प्रादेशिक संतुलन हे राजकीय पक्षाला राखावे लागते, त्यामुळे मी शर्यतीत नव्हतोच. 14 फेब्रुवारी रोजी आम्ही दिल्लीत सर्व एकत्र होतो. केवळ महत्वाच्या 3 महिने आधी ठरलेल्या भेटींमुळे मला मुंबईत अधिवेशनादरम्यान उपस्थित राहता आले नाही. याबाबत कुठलेही अन्य कारण नाही.”