भाजपाने प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केले; सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
भाजपाने ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदें गटात सामील झाले. जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर भाजपाने सरनाईक आणि महाराष्ट्राची हात जोडून माफी मागावी.
मुंबई : शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांची ईडीच्या कचाट्यातून सुटका होणार आहे. ईडीकडून केस मागे घेण्याची तयारी सुरू असून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईबाबात खळबळजनक दावा केला आहे.भाजपाने प्रताप सरनाईकांना ब्लॅकमेल केले असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केला आहे.
भाजपाने ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदें गटात सामील झाले. जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर भाजपाने सरनाईक आणि महाराष्ट्राची हात जोडून माफी मागावी असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपाने देशासमोर राज्याची प्रतिमा खराब केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे खोटे आरोप झाले नंतर ते सरकारमध्ये सामील झाले. यानंतर त्यांना क्लिनचीट देण्यात आली. त्यांच्यावर खोटे आरोप झाले की, ब्लॅकमेल करण्यात आले, याला राजकारण म्हणत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपवर घणाघात केला आहे.
वाॉशिंग मशीन मध्ये घातल्या सारखा प्रताप सरनाईक धुवुन आले असं म्हणत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी टीका केली होती.
काय आहे प्रताप सरनाईक यांचे ईडी प्रकरण
टॉप्स ग्रुप कंपनीला एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. 2014 साली झालेल्या कंत्राटामध्ये प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानेच ही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी टॉप्स ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडी अटक देखील केली होती.
मात्र, सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल झाल्याची माहिती विशेष पीएमपीएल न्यायालयाला देत याचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.
टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या सी समरी अहवालावर आक्षेप नसल्याचे सांगीतले. टॉप्स समूह गैरव्यवहराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महागनर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे. यामुळे प्रताप सरनाईक यांना ईडी चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे.