Sushma Andhare : हा तर संसदीय लोकशाहीचा ‘ईडी’घात, संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर सुषमा अंधारे यांचा आरोप
तुम्ही प्रत्येक वेळेस चौकशीला बोलवता आणि समोरच्याला भाजपात येण्यासाठी संधी देता आणि आजपर्यंत फुटलेले आमदार याच पद्धतीने गेल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर (BJP) केला आहे.
पुणे : प्रत्येक वेळेला ईडीची (ED Enquiry) भीती दाखवायची, चौकशी लावायची, मानसिक खच्चीकरण करायचे आणि वेगवेगळ्या मार्गाने विरोधकांना हैराण करायचे आणि मग त्याला पैल तीरावर नेण्यासाठी तयार करायचे हेच राजकारण भाजपाने सुरू केले आहे, असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपावर केला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. संजय राऊत यांच्या चालू असलेल्या ईडी चौकशीवर सुषमा अंधारे यांनी भाजपावर घणाघात केला आहे. हा तर आपल्या संसदीय लोकशाहीचा ईडीघात असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे. जर ईडीकडे एखाद्या विरोधात पुरावे (Evidence) असतील तर तुम्ही त्याची सारखी चौकशी का करता? त्याच्यावरती थेट कारवाई का करत नाहीत, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी ईडीला केला आहे.
‘सत्तांतरही याच पद्धतीचे होते’
तुम्ही प्रत्येक वेळेस चौकशीला बोलवता आणि समोरच्याला भाजपात येण्यासाठी संधी देता आणि आजपर्यंत फुटलेले आमदार याच पद्धतीने गेल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर (BJP) केला आहे. सत्तांतरही याच पद्धतीने त्यांनी केले. हा सरळसरळ संसदीय लोकशाहीवरचा ईडीघात आहे. राज्यात घडवलेले सत्तांतरही याच पद्धतीचे होते.
‘संजय राऊत यांचे मानसिक खच्चीकरण सुरू’
सततच्या ईडी चौकशीवरही त्यांनी आक्षेप घेतले. आमचे ऐका नाहीतर आम्ही हे करू, अशी भीती दाखवली जाते. तसेच खरेच पुरावे असतील तर वेळीच कारवाई का होत नाही, संधी का दिली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंतचे सर्व आमदार-खासदार जे फुटले त्या प्रत्येकाचे रेकॉर्ड पाहिले तर त्यांना नोटीस दिलेली आहे. मात्र वेळ दिल्याने ते दुसरीकडे गेले. संजय राऊत यांचे मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
संजय राऊत ईडीच्या ताब्यात
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही कारवाई केवळ सूडनाट्यातून करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 9 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना त्यांच्या भांडुपच्या राहत्या घरातून ईडीने ताब्यात घेतले. तर अशा या सगळ्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक आपल्या पाठीशी असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.