सुषमा अंधारे आता थेट कोर्टात, याचिकेत काय मुद्दे मांडणार?
गुलाबराव पाटील यांचा मेन प्रॉब्लेम माझी भाषणं हा नाहीये, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.
अनिल केऱ्हाळे, जळगावः शिवसेना (Shivsena) नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान भाषणांना परवानगी नाकारण्यात आल्याचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. माझ्या भाषणांमध्ये प्रक्षोभक किंवा दंगल घडवून आणण्यासारखे मुद्दे काय होते, असा सवाल सुषमा अंधारे कोर्टाला (Court) करणार आहेत. जळगावात सुषमा अंधारे यांच्या भाषणांना परवानगी नाकारण्यासाठी गुलाबराव पाटील यांनी दबाव टाकल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. मात्र आता त्या याविरोधात कोर्टात दाद मागणार आहेत.
जळगाव महाप्रबोधन यात्रेच्याप्रसंगी ही महाप्रबोधन यात्रा नसून यात जातीपातीचे राजकारण केलं जातंय असा अशी टीका सुषमा अंधारे यांच्यावर केली होती. याप्रसंगी मी स्वतः ऑनरेबल कोर्टाकडे माझी याचिका दाखल करणार असून कोर्टात माझी भाषा तपासण्याची मागणी करणार आहे. मी या भाषणामध्ये फक्त आणि फक्त संविधानिक कलम महापुरुषांचे विधान त्यांचे कोट आणि संत वचनाचा आधार घेतला. महाराष्ट्र जोडण्याची यासह महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न या महाप्रबोधन यात्रे प्रसंगी केला आहे. त्यामुळे गुलाबराव आता कुठल्या ना कुठल्या कारणासाठी मागे लपत आहे, अशी टीका करीत सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले.
”महाराष्ट्र जोडण्याची आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले आहेत. गुलाबराव पाटलांचा हा प्रॉब्लेम हा नाहीये. ते आता जाती-पातीच्या आड लपत आहेत. मध्ये मध्ये ते हिंदुत्वाच्या आड लपत होते. गद्दारी केली तेव्हा. मातोश्रीवाले आम्हाला भेटत नव्हते. निनांद्याला 12 बुद्ध्या म्हणतात, तसलं आहे हे.” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारे यांना शुक्रवारी जळगावात भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. माझा आवाज दाबला तरी मी गनिमी काव्यामार्फत बोलत राहीन, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
जळगावातील मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात त्यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आली. याठिकाणी महाआरतीचं नियोजन करण्यात आल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, सुषमा अंधारे सध्या जळगावातून बीड जिल्ह्यातील परळीत गेल्या आहेत. काल परळीकडे रवाना होताना सुषमा अंधारे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
मी जे काम करायला आले होते, ते फत्ते केले. काही लोक जिंकूनही हारतात आणि काही लोक हरलेली बाजीदेखील जिंकतात. फेसबुकपेजच्या माध्यमातून माझी सभा मी घराघरात पोहोचवली, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
दरम्यान, जळगावात मुक्ताईनगरमध्ये ज्या ठिकाणी सुषमा अंधारे यांची सभा होऊ शकली नाही, तेथे काही दिवसात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.