Tasgaon-Kavathe Mahankal : अजित पवारांचा मोठा डाव, तासगावमध्ये आर.आर.पाटील यांचा मुलगा हरणार का?
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha 2024 : तासगाव-कवठेमहांकाळमध्ये यंदा चुरशीची विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीने, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार दिला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या रोहित पाटील यांचा प्रवास सोपा नसेल. अजित पवार यांनी तासगाव-कवठेमहांकाळमध्ये स्थानिक पातळीवर एक मोठी खेळी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मागच्या दहा वर्षात पश्चिम महाराष्ट्रात भाजपाने हात-पाय पसरले. या भागातून भाजपाचेही आमदार-खासदार निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना हेरुन भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात विस्तार केला. याच पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सांगली. हाच सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता सांगलीमध्ये पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्या रुपाने अपक्ष खासदार आहे. काँग्रेसच्या समर्थनामुळे विशाल पाटील यांनी ही निवडणूक जिंकली. त्याआधी मागची दोन टर्म सलग 10 वर्ष संजय काका पाटील भाजपाचे खासदार होते. 2014 ते 2024 संजय काका पाटील भाजपाचे खासदार होते. सांगलीत भाजपाचा खासदार निवडून येणं म्हणजे सांगलीतील मतदार आता फक्त एका विचाराला बांधील नाही, तो आपलं मत आणि विचार कधीही बदलू शकतात हे स्पष्ट आहे. ...