नवाब मलिक आमच्या बुटांबद्दल बोलतात, पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील, दरेकरांचा हल्ला
विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. मलिकांच्या टीकेला आता दरेकर यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी 3 दिवस पाहणी दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जात नुकसानाचा आढावा घेतला. या दौऱ्यावरुन आता भाजप आणि सत्ताधारी आघाडीमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. मलिकांच्या टीकेला आता दरेकर यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. (Praveen Darekar responds to Nawab Malik’s criticism)
नवाब मलिक टीका करतात आणि विरोधी पक्षाच्या कोकणातील पाहणी दौऱ्यावर टीका करतात. मलिक आमच्या बुटांबाबत बोलतात. आम्ही बुट घातले की सुट घातले, हे नवाब मलिक बोलतात. आम्ही पाहणी करायची आणी यांनी घरात बसायचं. यापेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जा. कोकणची जनता तुम्हाला कोल्हापूरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढा संताप कोकणच्या जनतेच्या मनात आपल्याविषयी झाल्याचं दिसत आहे, अशा शब्दात दरेकर यांनी नवाब मलिकांवर जोरदार हल्ला चढवलाय.
नवाब मलिक काय म्हणाले होते?
विरोधकांना दौरा करायचा ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत. पंचनाम्याच्या आधारावर मदत जाहीर होते. किती किलोमीटर गेले, पायी किती गेले, किती दौरे केले हे आम्ही विरोधकांना विचारत नाही. विरोधक फिरत असताना दोघांचे एकसारखेच होते. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात. यांचे बूट Nikeचे की Pumaaचे हे ठाऊक नाही पण नटून जात आहे. मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीका केलीय.
‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते निघाले’
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते वैफल्यग्रस्त असल्याचं म्हटलं. आम्ही वैफल्यग्रस्त असूही. पण आज कोकणची जनता चिंताग्रस्त आहे. त्यांची चिंता दूर करा. नाहीतर कोकणच्या जनतेत जे वैफल्य येईल त्याने तुमची पळता भुई थोडी होईल. हेच आमचं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, असा टोलाही दरेकरांनी लगावलाय. सरकारच्या करणी आणि कथनीत फरक आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा म्हणजे ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते निघाले, अशा स्वरुपाचा झाल्याचा टोलाही दरेकरांनी हाणला. एका बाजूला आमचा 3 दिवसांचा दौरा तर मुख्यमंत्र्यांचा 3 तासांचा. त्यांच्या 3 तासांच्या दौऱ्यावरही आम्हाला आक्षेप नसता पण त्यांनी मदतीची घोषणा करायला हवी होती.
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!
विरोधी पक्ष नेते… ‘तीन दिवस’
मुख्यमंत्री… ‘तीन तास’
विरोधी पक्ष नेते, कोकणवासीयांच्या बांधावर उंबरठ्यावर जाऊन विचारपूस
मुख्यमंत्र्यांचा, केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2021
विमानतळावर कुठल्या चुली पेटवणार?
सामनातून संजय राऊत कोकणवासियांच्या चुली पेटवणार म्हणाले. पण विमानतळावर कुठल्या चुली पेटवणार आहात? असा खोचक सवालही दरेकरांनी विचारलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विमानतळावर अधिकाऱ्यांना बोलावून आढावा बैठक घेतली. त्यावरुन दरेकरांनी हा टोला लगावलाय. आढावा बैठकच घ्यायची असती तर ती मातोश्रीवरही झाली असती. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी दौरा केला म्हणून मुख्यमंत्र्यांना कोकणात यावं लागलं, अशी टीकाही दरेकरांनी केली.
संबंधित बातम्या :
कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रयत्न; राष्ट्रवादीची टीका
‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर प्रहार