विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचे उदय सामतांना आव्हान?
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला रोखण्यासाठी आणि आगामी विधासभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या चाचपणीला ठाकरे गटाकडून सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील काही महत्त्वाच्या नेत्यांनी उठाव केला. या उठावामुळे शिवसेनेत (Shiv sena) दुफळी निर्माण झाली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा द्यावा लागला होता. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवण्यात आलं आहे. मात्र आता ठाकरे गटाकडून देखील शिंदे गटाला रोखण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजन साळवी हे आता रत्नागिरीमधून ठाकरे गटाचे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत.
उदय सामंतांना साळवींचे आव्हान?
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्या मतदारसंघातून आता ठाकरे गटाकडून राजन साळवी हे निवडूक लढवणार आहेत. तसं झाल्यास उदय सामंत यांना राजन साळवींच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मंत्री उदय सामंत यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाने रणनिती आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोकणातील ताकद आणखी वाढवण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न असून, याच पार्श्वभूमीवर आता उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून शिंदे गटाची कोंडी
ज्या पद्धतीने शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर आता ठाकरे गटाकडून देखील मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी उठाव केला होता. त्यामध्ये संजय राठोड यांचा देखील समावेश होता. संजय राठोड यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाने पोहरादेवीचे महंत यांचा पाठिंबा मिळवला आहे. यामुळे संजय राठोड यांना मोठा फटका बसू शकतो. तर आता उदय सामंत यांच्या विरोधात राजन साळवी यांना उभे करून कोकणातील ताकद आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात ठाकरे गट असल्याचं पहायला मिळत आहे.