सर्वात मोठी बातमी, ठाण्यात मारहाण करण्यात आलेल्या रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल
ठाण्यात ठाकरे गटाच्या ज्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलीय त्याच महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या मारहाण प्रकरणी सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
निखिल चव्हाण, Tv9 मराठी, ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आलेली. या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहे. असं असताना या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी जखमी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
रोशनी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टवरुन राजकारण तापलं होतं. तसेच याच पोस्टवरुन वाद उफाळला आणि रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. तर रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मारहाण प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर आता ठाकरे गटाकडून काय भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे याच मारहाण प्रकरणावरुन ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते नरेश म्हस्के आणि मिनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांनी ठाणे पोलीस अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, महिला कार्यकर्ता मारहाण प्रकरणी पोलिसांनी एकही एफआयआर दाखल करुन घेतला नाही, असा उद्धव ठाकरेंचा आरोप आहे. त्यानंतर नरेश म्हस्के अनेक पदाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली. या सगळ्या घडामोडींनंतर आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय टीका केली?
“रोशनी शिंदे यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओही तयार करून घेण्यात आला.फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही झालं तर लगेच एसआयटी नेमली जाते. अटक केली जाते. मिंधे गटाकडून काही लोकांवर हल्ले झाले तर तिकडे फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही. एकूणच, गुंडागर्दीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंडमंत्री? मी म्हणत नाही, पण गुंड पोसणारं एक खातं असतं. त्यांनी जाहीर करावं. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना गुंडमंत्री असं खातं तयार करावं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
“सर्वोच्च न्यायालय म्हणतेय तसं या सरकारसारखे आम्ही शिवसैनिक नपुंसक नाहीत. मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून मुळासकट उखडून टाकण्याची जिद्द ठाण्याच्या नागरिकांमध्ये आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आयुक्त असून पदासाठी लाचारी करत असतील तर पदभार स्वीकारताना शपथ घेतली असेल तर त्या शपथेशी प्रतारणा आहे. बिनकामाचा आयुक्त याला निलंबित करा किंवा बदली करा. कणखर आयुक्त ठाण्याला द्या. ते खरच गृहमंत्री असतील नाहीतर लोकं तुमच्या कारभारावर थुंकतील”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.