सत्ता बदलाचे विदर्भाला फटके? नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय मुंबईला हलवलं
सत्ताबदलानंतर नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय आणि त्यात सुरु असेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयंही मुंबईत हलवण्यात आलं आहे.
नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्याचे फटके विदर्भातील जनतेला बसायला सुरुवात झाली आहे. सत्ताबदलानंतर नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय (CM office shifted to Mumbai) आणि त्यात सुरु असेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयंही मुंबईत (CM office shifted to Mumbai) हलवण्यात आलं आहे. यामुळे आता गडचिरोलीपासून ते बुलडाण्यापर्यंतच्या सर्व रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मुंबईत जावं लागणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालय नागपुरात सुरु केलं होतं. इथेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयंही होतं. पण आता सत्ता बदलली आणि नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालयाला टाळं लागलं. हे कार्यालय आता मुंबईत हलवण्यात आलं आहे.
नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय पुन्हा सुरु करावं, या मागणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.
नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचं कार्यालय, विदर्भात हजारो रुग्णांना हक्काचा आधार होता. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे अर्ज इथेच निकाली काढण्यात येत होते. हजारो रुग्णांना याचा लाभ मिळाला. गेल्या काही वर्षांत 6 हजार 200 च्या जवळपास लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 50 कोटींवर निधीचे वाटप करण्यात आले. आता हे कार्यालय बंद झालं आहे. त्यामुळे लोकांचा आधारच हिरावला गेला आहे. हे कार्यालय पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करु, असं मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
हजारो रुग्णांची गरज लक्षात घेता, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असं विदर्भवासियांचं म्हणणं आहे.