ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा… मी स्वत: रेड कार्पेट घालतो; राज ठाकरे असं का म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीचं मार्गदर्शन केलं. निवडणुकीचं तिकीट देण्यापासून ते निवडणुकीचा अजेंडा काय असेल इथपर्यंत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांनी आता पक्षातच झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. या विधानसभा निवडणुकीत कुणाला तिकीट देणार याचं सूतोवाचही राज ठाकरे यांनी आज केलं आहे. तसेच जे लोक पक्ष सोडून जाऊ इच्छितात त्यांना चांगलंच फटकारलं आहे. ज्यांना ज्याचं त्यांनी खुशाल जावं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्षांतराच्या पुड्यासोडून दबाव निर्माण करणाऱ्यांचे धाबे दणाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपच मांडला. आपल्या पक्षातील एखाद दोन पदाधिकारी कोणत्या तरी पक्षात जायच्या तयारीत आहेत, असं मी ऐकलंय. ज्यांना जायचं त्यांनी जा. मी स्वत: लाल कारपेट घालतो, जा म्हणून. पण नंतर तिकडे जाऊन जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल ते घ्यालच. त्यांचं स्थिर नाही, तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार? लोकसभेला काय झालं माहीत आहे ना? वर्षापर्यंत घुसले. आता कुठे कुठे घुसतील माहीत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज यांचं भाकीत
यावेळची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. सध्या कोण कोणत्या पक्षात आहे हे काही समजत नाही. पण येत्या विधानसभा निवडणुकीत मोठं घामासन होईल. सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होईल ते न भूतो असेल, असं भाकीतही राज ठाकरे यांनी वर्तवलं.
तेच तुमचं कँपेन असंल पाहिजे
विधानसभा निवडणुकीतील अजेंडा काय असला पाहिजे यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. पण त्याकडे सरकारचं लक्ष नाही. ते फक्त लाडका बहीण आणि लाडका भाऊ करत आहेत. राज्यातील प्रश्नांकडेही लक्ष दिलं पाहिजे. राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देणं हेच तुमचं विधानसभेतील कँपेन असलं पाहिजे. हाच तुमचा प्रचार असला पाहिजे, असं सांगतानाच एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका लढायच्या हे योग्य नाही. त्याने हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरे दौऱ्यावर
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेही राज्याचा दौरा करणार आहेत. 1 ऑगस्टपासून राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पावसाचा अंदाज घेऊन हा दौरा असेल. तसेच यावेळी ते पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र, कोणतेही मेळावे घेणार नाहीत. फक्त बैठकांवर जोर देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. तसेच या दौऱ्यावेळी मी कुणाच्या भेटीगाठी कराव्यात असं पदाधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्या भेटीही घेणार असल्याची घोषणा राज यांनी केली आहे.