उत्तर भारतातून राज ठाकरेंना डिमांड, रामलीलावर सभा घेऊन ‘राष्ट्रीय नेते’ बनणार?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातील सामनावीर ठरण्याच्या मार्गावर असलेला चेहरा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता, सत्ताधाऱ्यांचा प्रमुख विरोधक म्हणून राज ठाकरे यांची ओळख बनली आहे. राज ठाकरेंचा ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ हा डायलॉग राज्यभर गाजला आहेच, आता त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ उत्तर भारतातही गाजत आहेत. […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातील सामनावीर ठरण्याच्या मार्गावर असलेला चेहरा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता, सत्ताधाऱ्यांचा प्रमुख विरोधक म्हणून राज ठाकरे यांची ओळख बनली आहे.
राज ठाकरेंचा ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ हा डायलॉग राज्यभर गाजला आहेच, आता त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ उत्तर भारतातही गाजत आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील सोशल मीडियात राज ठाकरेंच्या भाषणांचं कौतुक होत आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात सभा घ्यावी, अशी मागणीही होत आहे. कधी काळी उत्तर भारतीयांचे विलन असलेले राज ठाकरे आता त्यांचे हिरो ठरण्याच्या मार्गावर आहेत.
शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर
राज ठाकरे ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहा यांची कथित पोलखोल करत आहेत, ते लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. मोदी-शाह किंवा भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि त्यांची सध्याची वक्तव्यं हे जणू शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर दाखवल्या जाणाऱ्या चित्राप्रमाणे राज मांडत आहेत. राज यांची ही पद्धत लोकांना भावत आहे.
सोशल मीडिया
राज ठाकरे हे मांडत असलेल्या मुद्द्यांना नेटीझन्सकडून लाईक्स मिळत आहेत. सोशल मीडियातील बहुतेक कमेंट्स राज ठाकरेंच्या बाजूच्या आहेत. राज ठाकरे ज्या पद्धतीने भाजपचा बुरखा फाडत आहेत, ती पद्धत लोकांना आवडत आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या या कौतुकाला राज्याच्या सीमेचंही बंधन नाही.
हिंदी मीडियात राज ठाकरे केंद्रस्थानी
राज ठाकरे सध्या मराठी माध्यमांच्या जेवढे केंद्रस्थानी आहेत, तेवढेच ते आता हिंदी मीडियाचंही केंद्रस्थान बनत आहेत. राज ठाकरे यांनी मराठी न्यूज चॅनलमधील पहिली मुलाखत टीव्ही 9 मराठीला दिली. त्यानंतर टीव्ही 9 समुहाचं नॅशनल न्यूज चॅनल ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ शीही राज ठाकरे यांनी संवाद साधला.
राज ठाकरेंची हिंदी मुलाखत
राज ठाकरेंच्या मराठी मुलाखती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित ठरत होत्या. मात्र राज यांच्या रडारवर मोदी-शाह असल्याने नॅशनल मीडियानेही राज यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हिंदी भाषेतील राज ठाकरेंच्या मुलाखतींना अल्पावधित लाखो व्ह्यूज मिळू लागले. राज यांच्या मुलाखतीच्या व्हिडीओखालील कमेंट लक्षवेधक ठरत आहेत.
हिंदी भाषिकांच्या प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या हिंदी मुलाखती पाहून त्याखाली अनेक हिंदी भाषिक प्रेक्षकांनी कमेंट दिल्या. या कमेंट खूपच बोलक्या आहेत.
“राज ठाकरे मांडत असलेले मुद्दे हे तंतोतंत खरे आहेत. मोदी-शाहांनी उत्तरं द्यावी”, अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. शिवाय अनेक कमेंट अशाही आहेत, ज्या राज ठाकरेंनी दिल्लीतील रामलिला मैदानात सभा घेण्याची मागणी करत आहेत.
राज ठाकरेंनी रामलीला मैदानात सभा घेऊन, देशातील जनतेला आपलं म्हणणं पटवून द्यावं, अशी प्रतिक्रिया वैरापेरुमल थंगावेलू या नेटकऱ्याने दिली आहे.
रामलीला मैदान
चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरेंनी रामलीला मैदानात सभा घ्यावी अशी मागणी केवळ एकानेच केली आहे असं नाही. अशा अनेक कमेंट सोशल मीडियात पाहायला मिळत आहेत. या कमेंट महाराष्ट्रातील युजर्सच्या नाहीत तर उत्तर भारतातील लोकांच्या आहेत.
उत्तर भारतीयांबाबतची प्रतिमा बदलली?
कधी काळी उत्तर भारतीयांना मारहाण करणारे अशी ख्याती असलेल्या राज ठाकरेंची प्रतिमा आता आपोआप बदलत आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मुंबईतील उत्तर भारतीय मंचावर हजेरी लावून आपलं म्हणणं हिंदीतून मांडलं होतं. महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्य हवं, हे राज ठाकरे यांची भूमिका आहे. जसं महाराष्ट्रात मराठी माणसाला, तसं यूपी-बिहार किंवा त्या त्या राज्यात त्या त्या लोकांना प्राधान्य हवं असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. हेच त्यांनी उत्तर भारतीय मंचावरही सांगितलं.
आता राज ठाकरे केवळ मराठीतून मोदी-शाहांची चिरफाड करत असले, तरी त्यांच्या हिंदी मुलाखती, मराठी भाषणांचं विविध भाषांतरीत व्हिडीओ अनेक राज्यात व्हायरल होत आहेत. राज यांची भूमिका, त्यांचे अनेक मुद्दे लोकांना पटत आहेत. त्यातूनच राज ठाकरे यांनी रामलिला मैदानात सभा घ्यावी अशी मागणी होत आहे. जर राज ठाकरे यांची रामलिला मैदानात सभा झाली, तर निश्चितच त्याचा मोठा परिणाम मतदानावर होऊ शकतो, असं जाणकारांचं मत आहे.