Udayanraje Bhonsle : …तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यात जावं, उदयनराजे भोसलेंचा राज्यपालांच्या वक्तव्यावर संताप
शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी कोश्यारींच्या वक्तव्यावर टीका केली. तर उदयनराजे भोसले यांनी तर दुसऱ्या राज्यात जावे, असा संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यात जावे, असा संताप भाजपा नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी व्यक्त केला आहे. ट्विट करत त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले. मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी समाज वगळला तर मुंबईत पैसा राहणार नाही. आर्थिक राजधानीदेखील राहणार नाही, अशाप्रकारचे वादग्रस्त आणि अपमानजनक वक्तव्य त्यांनी केले होते. यावर भाजपाने (BJP) बचावात्मक तर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोश्यारींनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनेही आज करण्यात आली. त्यानंतर आता उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
‘हा महाराष्ट्राचा अपमान’
उदयनराजे भोसले ट्विटमध्ये म्हणतात, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकेच नाही, तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे, असे टीकास्त्र त्यांनी भगत सिंग कोश्यारी यांच्यावर सोडले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 30, 2022
आधी वादग्रस्त वक्तव्य, नंतर सारवासारव
मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर राज्यपालांनी सारवासारव केली आहे. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र किंवा मराठी व्यक्तीचा अपमान होणार नाही, अशाप्रकारचे स्पष्टीकरण दिले मात्र त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. दरम्यान, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह विविध नेत्यांनी कोश्यारींच्या वक्तव्यावर टीका केली. तर उदयनराजे भोसले यांनी तर दुसऱ्या राज्यात जावे, असा संताप व्यक्त केला आहे. त्यांनी माफी मागावी तसेच हे पार्सल दुसरीकडे पाठवावे, अशी टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.