Uddhav Thackeray : शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांशी डील करण्याचा प्रयत्न?; मोदी, शहांनाही फोन?
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे 26 आमदारांना घेऊन सुरतला गेल्याचं 21 जून 2022 रोजी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या. शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी ठाकरे यांनी नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला.
मुंबई: शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं सरकार आलं आहे. हे सरकार आल्यानंतर आता शिंदे गटाच्या बंडाच्या काळातील इन्साईड स्टोऱ्याही बाहेर येऊ लागल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेषांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायचे. दोन्ही नेत्यांची मध्यरात्री भेट व्हायची आणि चर्चा व्हायची. ही माहिती जशी समोर आली, तशीच आता दुसरी माहितीही समोर आली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून डील करण्याचाही प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी खुर्ची वाचवण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, या दोन्ही नेत्यांनी प्रतिसाद न दिल्याने ठाकरे यांना पायउतार व्हावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एकनाथ शिंदे 26 आमदारांना घेऊन सुरतला गेल्याचं 21 जून 2022 रोजी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या. शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी ठाकरे यांनी नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आधी आपल्यासोबत असलेल्या विधेयकांशी चर्चा करून त्यांचं मन वळवून त्यांना आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी सुरतमधील आमदारांना गुवाहाटीला पाठवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे यांच्या सोबतचे आमदारही सुरत व्हाया गुवाहाटीला जाऊ लागले. त्यामुळे उद्धव ठाकरे पुरते हादरून गेले होते, असं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.
फडणवीस म्हणाले, आता शक्य नाही
उद्धव ठाकरे यांनी या संकटाच्या काळात त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि कॅबिनेट मंत्री राहिलेल्या एका नेत्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आमदारांना आपण रोखू शकत नाही आणि आमदारांची होणारी गळतीही थांबवू शकत नाही हे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी स्वत: फडणवीस यांच्याशी चर्चाही केली होती, असं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना प्रस्ताव
भाजपने थेट आमच्यासोबत यावं. म्हणजे शिंदे यांचं बंड मोडीत काढलं जाईल, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला. पण आता गोष्टी बऱ्याच पुढे गेल्या आहेत. आता काही करता येत नाही, असं फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं समजतं. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील हे पहिलच थेट संभाषण होतं.
मोदी, शहांनाही फोन, पण उपयोग नाही
भाजप नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांना फोन केला. परंतु दोघांनीही काहीच प्रतिसाद दिला नाही. 2019मध्ये भाजपच्या नेतृत्वाने अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरेंशिवाय शिवसेनेसोबत जाण्याचा भाजपने निर्णय घेतला होता, असं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंचे तीन पर्याय
दरम्यान, शिवसेनेच्या काही खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. या खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे मध्यस्थीचा प्रस्तावही ठेवला होता. जेव्हा या खासदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले होते. मात्र, खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असं सूत्रं सांगतात.
शिंदे मागे फिरण्याच्या मनस्थितीत नाही
भाजपसोबत जाण्याचा कोणता ना कोणता मार्ग निघणार नाही, असं उद्धव ठाकरे सातत्याने सांगत होते. एवढेच नव्हे तर शिवसेना खासदारांनाही भाजप नेतृत्वाकडून काहीच प्रतिसाद आलेला नाही. काही शिवसेना पदाधिकारी रश्मी ठाकरे यांचा एक निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते. मात्र, भाजपकडूनच कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने शिंदेही मागे फिरतील अशी परिस्थिती दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे.