धगधगत्या ‘मशाली’चे धोके लक्षात घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
अंधेरीमधील उत्साही कार्यकर्ते ठाकरेंच्या भेटीसाठी थेट मशाल हातात घेऊन ‘मातोश्री’वर दाखल झाले.
मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिले आहे. तर, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाले आहे. चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. नवे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. अंधेरीमधील उत्साही कार्यकर्ते ठाकरेंच्या भेटीसाठी थेट मशाल हातात घेऊन ‘मातोश्री’वर दाखल झाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली, तसेच त्यांना संबोधितही केले. मशालीचे महत्त्व, तेज, धोके लक्षात घ्या. मशाल हाताळताना उत्साहाच्या भरात काही चूक होऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. ही अन्याय आणि गद्दारी जाळणारी मशाल आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला देखील लगावला.
दरम्यान, राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मशाल पेटवून जल्लोष साजरा करत आहेत. ठाणे, भिवंडी, कोल्हापूर, सिंधुदूर्ग सह अनेक जिल्हयातील कार्यकर्ते मशाल घेऊन मातोश्रीवर येत आहेत. तर, मुंबईत काढलेली मशाल यात्रा पोलिसांनी अडवली होती.