Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अजूनही आमदार? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण आमदारकीचं गूढ वाढलं
8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 14 ते 2020 ते 13 मे 2026 पर्यंत दाखवण्यात आलाय.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या (Maharashtra Political Crisis) राजकारणात खळबळ उडाली होती. विश्वासदर्शक ठरावाआधीच उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिली देखील. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलेलं होतं. 29 जून रोजी केलेल्या या फेसबुक लाईव्हनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांची आमदारकी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय. कारण समोर आलेल्या एका यादीमध्ये उद्धव ठाकरे हे अजूनही आमदार असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे ही यादी विधिमंडळाच्या वेबसाईटवरही असून त्यात शिवसेनेच्या विधानसपरिषदेतील 12 आमदारांमध्ये (Shiv Sena MLA) उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आढळून आला आहे. जुलै 2022मध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जरी दिला असला, तरी त्यांनी अद्याप विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा खरंच दिला आहे की नाही? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.
आश्चर्यकारक तारखा
8 जुलै 2022 ला विधान परिषदेच्या आमदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा उल्लेखही आढळून आला असून त्यात उद्धव ठाकरेंचं नाव दिसून आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद – LIVE https://t.co/FwyNWfuAaP
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 1, 2022
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी दिला होता. त्यानंतर 9 दिवसांनी विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख आढळून आल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
यादीत काय आणि कोण कोण?
8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 14 ते 2020 ते 13 मे 2026 पर्यंत दाखवण्यात आलाय. याच यादीमध्ये शिवसेनेच्या इतर आमदारांचाही समावेश असून त्यात मनिषा कायंदे, अनिल परब, आमशा पाडवी, विलास पोतननीस, नीलम गोऱ्हे, सचिन अहिर, सुनिल शिंदे, विप्लव बाजोरीया, अंबादार दानवे, दुष्यंत चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.
2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर विधान परिषदेवर बिनविरोध निवड होत त्यांना विधिमंडळाचं सदस्यपद मिळवण्यात यश आलं होतं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर अखेर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले होते.