मुंबई: एक दोन नव्हे तर तब्बल 12 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता ठाकरे गट कामाला लागला आहे. आपल्या लोकसभेच्या सर्व जागा राखण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गट कामाला लागला आहे. मुंबईतील लोकसभा जागांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाने आज शिवसेना भवनात एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. स्वत: उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहून स्वत: आढावा घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचा आज पक्षाच्या मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. शिवसेना भवनात ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक तीन टप्प्यात होणार आहे. एक दुपारी 12 वाजता, दुसरी दुपारी 1 वाजता आणि तिसरी दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे.
या बैठकीला शिवसेनेचे उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा समन्वयक, विधानसभा संघटक, शाखाप्रमुख, महिला विभाग संघटक, युवासेना विभाग अधिकारी, माजी खासदार, माजी आमदार, विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि नगरसेवकांना बोलावण्यात आलं आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिमचा आढावा घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पूर्व तसेच तिसऱ्या टप्प्यात मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिणचा आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीत मतदारसंघातील परिस्थिती, वातावरण आणि सुरू असलेल्या कामांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मतदारसंघातील वातावरण अधिक पोषक करण्यासाठी काय करता येईल यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सहाही लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी काय रणनीती आखता येईल याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार असून त्यांना काही सूचनाही दिल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाचं मुंबईत किती वर्चस्व आहे. शिंदे गटामुळे किती नुकसान होऊ शकतं? याची चर्चाही या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.