आज पायावर पडणारे, उद्या पाय खेचणार असतील तर… दैनिक ‘सामना’तून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल
शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ आणि हवा स्वच्छ केली, असं आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवार यांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या निर्णयाची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून या राजीनाम्याची मिमांसा करताना दोन कारणे सांगितली आहेत. एक म्हणजे, पक्षातील ईडी सारख्या तपास यंत्रणामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात असावं. दुसरं कारण म्हणजे, अजित पवार आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? असा सवाल ‘सामना’तून करण्यात आला आहे. हा सवाल करतानाच अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत होते, अशी पोलखोल करतानाच मुख्यमंत्रीपद मिळवणे हेच अजितदादांच्या राजकारणाचं अंतिम ध्येय असल्याचं म्हटलं आहे.
अग्रलेखातील भाष्य जसंच्या तसं…
शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशनावेळी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा आणि राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता. आणि त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. पवारांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची ‘सांगता’ अशा काही धक्कादायक प्रकाराने होईल याची पुसटशी कल्पनाही नसावी.
पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे आणि पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे आणि राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला.
माणसाला जास्त मोह नसावा आणि कधीतरी थांबायला हवे हे खरेच, पण राजकारणातला मोह कुणाला सुटला? धर्मराज आणि श्रीकृष्णालाही सुटला नाही. पंतप्रधान मोदी तर स्वतःला फकीर मानतात. मात्र त्यांनाही राजकीय मोहमायेने जखडून ठेवले आहे. त्यात पवार हे पूर्णवेळ राजकारणी. अशा राजकीय माणसाने राजीनामा देऊन खळबळ उडवावी यामागचे राजकारण काय? याचा शोध काही जण घेऊ लागले तर आश्चर्य नाही.
शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन आणि पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो. शरद पवार यांनी राजीनामा देताच त्यांची मनधरणी सुरू झाली हे स्पष्ट दिसते.
अजित पवारांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत आणि त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्या जास्त विलाप केला.
शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ आणि हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी . शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील.