शिवसैनिकांना कॅनडा आणि ब्रिटनमधूनही फोन आले; उद्धव ठाकरेंना आठवला तो किस्सा
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीआधी घडलेला किस्सा कार्यकर्त्यांसह शेअर केला.
मुंबई : ठाकरे मशाला चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहायला मिळत आहेत. तर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत जल्लोषात सहभागी होत आहेत. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या उरणचे कार्यकर्ते मातोश्रीवर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीआधी घडलेला किस्सा कार्यकर्त्यांसह शेअर केला.
दसरा मेळाव्याकडे जगाचं लक्ष होतं. तुम्ही म्हणाल जगाचा काय संबंध आहे? मला तर शिवसैनिक भेटायला येतात. त्या शिवसैनिकांना कॅनडा आणि ब्रिटनमधून मराठी माणसांचे आणि हिंदूंचेसुद्धा फोन आले. दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या असे उद्धव ठाकरे यांनी सांगीतले.
मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंनी स्वागत केले. या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विरोधी गटावर निशाणा साधला.
शिवसेनेत अनेकवेळा बंड झालं. पण शिवसेना ताकदीनं उभी राहिली. याहीवेळी तेच होईल असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेनेला 56 वर्षे झाली. आजपर्यंत 56 काय, कित्येक 56 पाहिले. ज्या ज्या वेळी आघात करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी शिवसेना संपत नाही. उलट आघात करणाऱ्याला शिवसेना गाडून पुढे जात आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उरणमधून मातोश्रीवर आलेल्या एका शिवसैनिकानं आपल्या अंगावरच उद्धव ठाकरे गटाचं नाव आणि निशाणी गोंदली. त्याचीही उद्धव ठाकरेंनी स्तुती केली.