Video | महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री करणार! उद्धव ठाकरे यांचे मोठे संकेत, कोण असेल तो चेहरा?
उद्धव ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण असेल? तो शिवसेनेचाच असेल का? की बाहेरच्या पक्षाच्या चेहऱ्याला संधी दिली जाईल... या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईः महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री (Lady CM) विराजनमान करण्याचे मोठे संकेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं. पक्षाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. ही अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच आगामी मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदाविषयी संकेतही दिले.
कुठे केलं वक्तव्य?
मुंबईत काल लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या वेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं.
नेमकं वक्तव्य काय?
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या अनुभवतोय… गद्दार आता मूठभरही नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत.
भाषणात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. महिला असो किंवा पुरुष…
पाहा उद्धव ठाकरे यांचं ते वक्तव्य…
नवा चेहरा कोण?
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे वक्तव्य खूप विचारपूर्वक केलेलं असणार, हे निश्चित आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण असेल? तो शिवसेनेचाच असेल का? की बाहेरच्या पक्षाच्या चेहऱ्याला संधी दिली जाईल… या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेतल्या नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, प्रियंका चतुर्वेदी अशा महिला नेत्यांनी वारंवार शिवसेनेच्या भूमिका परखडपणे मांडल्या आहेत. त्यात रश्मी ठाकरेंचंही नाव नेहमीच चर्चेत असतं. नव्याने आलेल्या सुषमा अंधारेही शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख निर्माण करत आहेत. तर महाविकास आघाडीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही चर्चा आता रंगू लागली आहे.