Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्झिटच्या तयारीत?
Uddhav Thckeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्झिटच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला. मंत्रालयातल्या सर्व सचिवांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) एक्झिटच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला. मंत्रालयातल्या सर्व सचिवांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटणार आहेत. दुपारी 12.30 वा. ते ही भेट घेतील. यानंतर ते ऑनलाईन सर्व सचिवांना संबोधित करणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद (Maharashtra Chief Minister) सोडण्याआधी ते हे संबोधन करणार असल्याचं सांगितलं जातंय. सगळ्यांचे आभार मान्यासाठी आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी उद्धव ठाकरे सचिवांना संबोधित करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी वर्षा बंगला (Varsha Bungalow) सोडला होता. बुधावारी रात्री ते मातोश्रीवर सहकुटुंब परतले होते. यावेळी मोठी शक्तिप्रदर्शनंही करण्यात आलेलं होतं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष होते. या तिन्ही पक्षांत ज्येष्ठ राजकीय नेते होते. यांना सांभाळण्यासाठी तुम्हालाच मुख्यमंत्रीपद घ्यावं लागेल, असं शरद पवारांनी आपल्याला सांगितलं होतं, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मी ते अनपेक्षितपणे आलेलं मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. अडीच वर्षांपैकी दोन वर्षांचा काळ हा सरकारसाठी जागतिक महामारीचा काळ होता. कोरोनामध्ये सरकारनं चांगली कामगिरी करुन दाखवली, याचाही पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला होता. फेसबुक लाईव्ह दरम्यान, त्यांनी राजकीय घडामोडींवर भावनिक साद घातली होती.
तर मी राजीनामा देतो…
माझ्याच पक्षातील लोकांना जर मी मुख्यमंत्री नको असेन, तर मला सांगा, मी राजीनामा देतो, असं ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दोन ट्वीटमधून चार मुद्दे मांडले आणि महाविकास आघाडी सरकारमधून शिवसैनिकांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण या घडामोडींनी ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुढे नेमकी काय रणनिती अवलंबतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
बंडानंतर एकनाथ शिंदे गट मजबूत!
एकनाथ शिंदे – 47
भाजप – 106
अपक्ष – 13
एकूण – 166
बंडानंतरची महाविकास आघाडीची अवस्था
शिवसेना – 14
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 44
अपक्ष – 10
एकूण – 121