मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे युतीत परतणार होते, या नेत्याने केला दावा
साल 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे युतीत परतण्याच्या विचारात होते असा दावा एका नेत्याने केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : साल 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मतपरिवर्तन झाले होते आणि ते पुन्हा भाजपासोबत युतीकरण्याच्या विचारात होते असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर जूनमध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासमोर संजय राऊत यांनी ही बाब सांगितल्याचे अजित पवार यांच्या गटाचे नेते एनसीपीचे प्रदेश अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
तटकरे पुढे म्हणाले की, ‘सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर या बैठकीत संजय राऊत यांच्यासोबत होते. राऊत यांनी आम्हाला सांगितले की उद्धव यांचे मन बदलले आहे आणि ती भाजपामध्ये परतण्याचा विचार करीत आहेत. ही बैठक दिल्ली दौऱ्यानंतर 15 दिवसानंतर झाली होती. तटकरे पुढे म्हणाले की शिंदे आणि नार्वेकर यांनी राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली होती, परंतू त्याबाबत आपण काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मी संजय राऊत यांनी सांगू इच्छीतो की त्यांनी जरूर आमच्यावर टीका करावी परंतू त्यांनी आपल्या भाषेवर लक्ष द्यावे. त्यांना एनसीपीवर विनाकारण टीप्पणी करायचा काही अधिकार नाही असेही ते म्हणाले. इंडीयन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या शक्यतेवर तटकरे म्हणाले की साल 2004 मध्ये एनसीपीला सीएम पद मिळण्याची संधी होती. त्यावेळी कॉंग्रेसपेक्षा आमच्या जागा जादा होत्या. परंतू आम्ही आमचा मुख्यमंत्री का बनविला नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही. कारण तेव्हा मी कनिष्ठ होतो. परंतू एनसीपीच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचे म्हणणे होते मुख्यमंत्री पद घ्यायला हवे होते.
अजित पवार केवळ स्वप्नातच मुख्यमंत्री !
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पुतणे बंडखोर नेते अजित पवार हे कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनविणार नाहीत असे म्हटले आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की सत्तर टक्के राज्यात भाजपाचे सरकार नाही, महाराष्ट्राची सत्ताही त्यांच्या हातून जाईल. राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपासोबत उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री पद मिळणार असल्याच्या चर्चेवर विचारता शरद पवार म्हणाले की अजित पवार केवळ स्वप्नातच मुख्यमंत्री बनू शकतात ! महाविकास आघाडीचे सरकार 2024 च्या निवडणूक राज्यात सत्तेत येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.