उद्धव ठाकरे आज दोन हाडवैऱ्यांचं मनोमिलन करणार?
बुलडाणा: तब्बल 3 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार विजयराज शिंदे म्हणजेच ‘ राजे ‘ आणि विद्यमान खासदार तथा शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे. म्हणूनच की काय सध्या राजे हे बुलडाणा सोडून अमरावतीला आनंदराव अडसूळ यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. बुलडाण्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राजेंचा गट अद्यापही सक्रिय नसल्याने, याचा फटका […]
बुलडाणा: तब्बल 3 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार विजयराज शिंदे म्हणजेच ‘ राजे ‘ आणि विद्यमान खासदार तथा शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे. म्हणूनच की काय सध्या राजे हे बुलडाणा सोडून अमरावतीला आनंदराव अडसूळ यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत.
बुलडाण्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राजेंचा गट अद्यापही सक्रिय नसल्याने, याचा फटका प्रतापराव जाधवांना बसण्याची शक्यता आहे. हे प्रतापरावांना माहिती असूनही त्यांनी विजयराजेंपुढे नमते घेतलं नाही. मात्र आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा खामगावात होत असून, या दोघांचे मनोमिलन ते घडवणार का ? याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागलं आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विजयराज शिंदे यांनी शिवसेनेकडून तीन वेळा आमदारपद भूषवलं आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. ही हार विजयराज यांच्या जिव्हारी लागल्याने, खासदार प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांचे राजकीय वैर वाढतच गेले. जिल्ह्यातील शिवसैनिकांनाच नव्हे तर विदर्भापासून ‘मातोश्री’पर्यंत सर्वांना या वैराची माहिती आहे.
शिवसेनेच्या कोणत्याच कार्यक्रमात एकमेकांना बोलावलं जात नाही. त्यांचे फोटोही लावले जात नाहीत. दोघेही एकला चलोरेच्या घोषणा करतात. सध्या लोकसभा निवडणूक चालू असताना विजयराज शिंदे हे बुलडाणा उमेदवार प्रतापराव जाधव यांचा प्रचार सोडून अमरावतीला आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर त्यांचा जो गट आहे तो अद्यापही प्रचारात सक्रिय नसल्याचे दिसतंय.
विजयराज शिंदे यांच्याविषयी बोलायचे झाले तर बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे यांचे चांगले काम आहे. तळागाळातील नेता म्हणून त्यांच्याकडे पहिलं जातं. चहाची टपरी चालवण्यापासून शिवसैनिक आणि तब्बल 3 वेळ आमदार असा त्यांचा प्रवास. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात त्यांची पकड आहे. शिवाय ‘मातोश्री’वरही त्यांचे वजन आहे.
प्रतापराव जाधव आणि विजयराज यांचे पटत नसल्याने, यावेळी प्रतापराव जाधव यांना लोकसभा मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता आहे.
बुलडाण्याचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्याप्रचारासाठी खामगावात आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे. यापूर्वी सुद्धा याच खामगावात 2 वेळा उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यावेळी प्रतापराव जाधव हे दोन्ही वेळा चांगल्या मताधिक्याने निवडून आले. मात्र ती परिस्थिती सध्या राहिली नाही. कारण प्रतापराव जाधव यांच्या 10 वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात जिल्ह्यात फारसा विकास झाला नसल्याची ओरड होत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात नाराजी पसरलेली आहे. यावेळी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे हे सुद्धा तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणूक अतिशय काट्याची होणार आहे. जर विजयराज शिंदे यांच्या गटाने सेनेच्या उमेदवाराचे काम केले नाही, तर याचा फटका प्रतापराव जाधवांना नक्कीच बसणार यात शंका नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आज या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन करणार का याकडे बुलडाणावासियांच्या नजरा लागल्या आहेत.