Uddhav Thackeray: मी पक्ष चालवायला नालायक असेल तर निर्णय तुमचा, मी आता राजीनामा देतो, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार
तुम्हाला मी पक्षप्रमुख किंवा पक्ष चालवायला योग्य वाटत नसेल तर तुम्ही मला सांगा की, उद्धवजी आजपर्यंत केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही नेता म्हणून तुम्हाला मानलं. पण तुम्ही शिवसेना नीट चालवू शकत नाही, दूर व्हा. मी आता माझ्या पदाचा राजीनामा देईन. मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. पण माझी शिवसेना कुणी चांगल्या प्रकारे पुढे नेत असेल तर मी पदातून मोकळा व्हायला तयार आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील सर्व नगरसेवकांची आज व्हीसीद्वारे बैठक (Meeting) घेतली. यावेळी राज्यातील 2 हजार नगरसेवक (Corporator) बैठकीला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी मी नालायक असेल तर सांगा, मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे, याचा पुनरुच्चार केला. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं, तुम्ही उद्धवला जपा, आदित्यला जपा. पण याचा अर्थ असा नाही की, केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून मी कसाही वेडावाकडा तुमच्याशी वागेन. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की, मी जर पक्ष चालवायला नालायक असेन, योग्य नसेन तर तुम्ही शिवसेनाप्रमुखांनी केलेलं आवाहनही मागे ठेवा. शिवसेनाप्रमुख असते तर मी त्यांचा पुत्र जरी असलो आणि वेडावाकडा वागलो तर त्यांनी मला माफ केलं नसतं. आता ती जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तुम्ही पुढे या आणि शिवसेना पुढे न्या
तुम्हाला मी पक्षप्रमुख किंवा पक्ष चालवायला योग्य वाटत नसेल तर तुम्ही मला सांगा की, उद्धवजी आजपर्यंत केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही नेता म्हणून तुम्हाला मानलं. पण तुम्ही शिवसेना नीट चालवू शकत नाही, दूर व्हा. मी आता माझ्या पदाचा राजीनामा देईन. मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. पण माझी शिवसेना कुणी चांगल्या प्रकारे पुढे नेत असेल तर मी पदातून मोकळा व्हायला तयार आहे. तुम्ही पुढे या आणि शिवसेना पुढे न्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला
शिवसेना मर्दांची सेना आहे. आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेत गद्दार नकोच. रक्ताचं पाणी करुन लोकांनी निवडून दिलं. गेलेले काही आमदार आजही मला फोन करतायत. भाजपात जाण्यासाठी आमदारांचा शिंदेंवर दबाव होता. मुख्यमंत्रीपदाचा मोह आधीही नव्हता, आताही नाही, पुढेही नसणार. तुम्ही सांगा, मी आताही राजीनामा द्यायला तयार आहे. या अडीच वर्षाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो, अजूनही आहे. पण मी सुख काय भोगलेलं आहे. जगावर कोविड सारखं संकट आलं, त्याचा सामना आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं केला. त्याच्यानंतर माझ्या तब्येतीचं कारण आलं. हे सगळं बघितलं तर आनंद म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा काय घेतलेला आहे सांगा. शिवसेना ही एक विचार आहे आणि हा विचार भाजपला संपवायचा आहे. त्यांना हिंदुत्वामध्ये दुसरी व्होटबँक नकोय, असे उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले. (Uddhav Thackeray’s resignation reiterated in the meeting of Shiv Sena corporators)