अखेर ठरलं! शिवशक्ती-भीमशक्तीचा आणखी नवा प्रयोग, ‘या’ तारखेला घोषणा
प्रकाश आंबेडकरांची अडचण, महाविकास आघाडीच आहे. कारण आंबेडकरांना ठाकरेंची युती करायची आहे आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा घटक आहेत.
मुंबई : ठाकरे गट आणि वंचितची युती कधी होणार? याच्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाशी नातं जुळलं नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना सांगितलं. मात्र असं असलं तरी सोमवारी म्हणजे 23 जानेवारीलाच ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. पाहुयात
वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी, ठाकरे गटासोबत युतीच्या चर्चेवर मिश्किल भाष्य केलंय. ठाकरे गट-वंचितच्या युतीच्या चर्चा गेल्या 2 महिन्यांपासून सुरु आहेत. पण आमचं नातं जुळत नसून सध्या लाईन मारणं सुरु आहे, असं मिश्किलपणे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
प्रकाश आंबेडकरांची अडचण, महाविकास आघाडीच आहे. कारण आंबेडकरांना ठाकरेंची युती करायची आहे. आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा घटक आहेत. त्यामुळं ठाकरे गट आणि वंचितची युती झाली तरीही वंचितला जागा वाटपात ठाकरे गटातल्या हिस्स्यातूनच जागा मिळतील.
प्रकाश आंबेडकरांच्या गेल्या काही दिवसांतल्या भेटीगाठी पाहिल्या तर ते उद्धव ठाकरेंनाही भेटतायत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी घेत आहेत. पण युती उद्धव ठाकरेंशीच होणार हेही प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतायत. त्याचवेळी ते काँग्रेस आणि विशेषत: शरद पवारांवर टीका करतायत.
म्हणजेच शरद पवारांमुळंच ठाकरे गट आणि वंचितचं नातं जुळत नाहीय, असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय का?, हाही प्रश्न आहे. भिमशक्ती आपल्यासोबत यावी, यासाठी उद्धव ठाकरेंचेही प्रयत्न सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेही प्रयत्न आहेत. जोगेंद्र कवाडेंना सोबत घेण्यात शिंदेंना यश आलं. आता वंचितचं काय होणार? हे कळेलच.