पवार ‘इथून’ लढले असते, तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो : प्रकाश आंबेडकर
मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून निवडणूक लढली असती, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. पण शरद पवार नागपुरातून प्रचारालाही गेले आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. नागपुरात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले […]
मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून निवडणूक लढली असती, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. पण शरद पवार नागपुरातून प्रचारालाही गेले आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली.
नागपुरात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यात लढत झाली.
काँग्रेस-राष्ट्रवादीनं मला पाडायची रणनीती आखली, असा आरोप करत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ” आम्हाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं, पण आम्ही आमची मतं मिळवणार आणि जरी काँग्रेसनं आमचा खिमा केला, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष ताकदीबरोबर राहणार.” तसेच, ना भाजप, ना काँग्रेस, प्रादेशिक पक्षांना या निवडणुकीनंतर महत्त्व असेल, असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी वर्तवला.
एक्झिट पोलबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारले असता, ते म्हणाले, “एक्झिट पोल हे तज्ञ लोक बनवतात. त्यांना मी चॅलेंज करु शकत नाही. एक्झिट पोलवर विश्वास नाही. निकाल आल्यावर सर्वांना कळेल.”
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पहिल्यांदा प्रश्न उभे राहिलेत. निवडणूक आयोगाची आधीची भूमिका आणि आताची भूमिका यात तफावत आहे. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकते, यापूर्वीही असं घडलेलं आहे, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. शिवाय, जर ईव्हीएम नीट चाललं तर भाजपचा पराभव अटळ आहे, असेही ते म्हणाले.
भाजप आताच सेलिब्रेशन करतेय, पण मुल जिवंत की मेलेलं आहे हे पाहण्यासाठी वाट पाहायला हवी होती, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी एक्झिट पोलवर सेलिब्रेशन करणाऱ्या भाजपला लगावला.
तसेच, वंचित बहुजन आघाडी लढवलेल्या सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.