Video : ‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा’, महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट, भाजप भिडणार?
उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर शरसंधान साधलं. त्यानंतर गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर टीका केली. आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
मुंबई : राम मंदिर उभारणीसाठी भाजपकडून सध्या निधी संकलन अभियान सुरु आहे. देशभरातील जनतेकडून निधी गोळा करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. लोकही मोठ्या भक्तीभावाने राम मंदिरासाठी निधी देऊ करत आहेत. मात्र भाजपच्या या अभियानावर विरोधी पक्षाने जोरदार टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर शरसंधान साधलं. त्यानंतर गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर टीका केली. आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.(Satyajit Tambe criticizes BJP’s fund raising program for Ram Mandir)
‘श्रीराम फक्त भाजपच्या जाहीरनाम्यात’
सत्यजित तांबे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपविरोधी असलेल्या एका पक्षाचा नेता भाजपच्या ठायी श्रीराम काय आहेत? हे टीकात्मक स्वरुपात सांगत आहेत. हिंदी भाषेतील या व्हिडीओमध्ये ते नेते देव देवतांची एक गोष्ट सांगत आहेत. त्या गोष्टीत सर्व देवांमध्ये कोण श्रेष्ठ हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यावेळी सर्वजण आधी गंगा नदीकडे जातात. त्यानंतर महादेवाकडे जातात. पुढे सर्वजण पर्वताकडे जातात. पर्वतापासून पुन्हा सर्वजण हनुमानाकडे जातात आणि शेवटी सर्वजण श्रीरामाकडे येतात. तेव्हा श्रीराम त्यांना सांगतात मी तर भाजपच्या जाहीरनाम्यात पडून असतो. त्यामुळे मी कसा काय मोठा? जेव्हा निवडणूक आली तेव्हा मला बाहेर काढलं जातं आणि निवडणूक संपली की पुन्हा मी आहे तिथे, अशा शब्दात हे नेते भाजपची खिल्ली उडवत आहेत.
#जय_श्रीराम #JAISRIRAM pic.twitter.com/8YMVdG48lJ
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 4, 2021
दरम्यान, सत्यजित तांबे यांनी ट्वीट केलेल्या या व्हिडीओमुळे आता भाजप नेते चांगलेच तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांबे यांच्या या ट्वीटला भाजप नेत्यांकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचं भाजपवर शरसंधान
बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी विध्वंसाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची तुम्ही वेळोवेळी आठवण काढली. त्याबद्दल तुमचे आभार की तुम्ही अजून त्यांना तरी विसरला नाहीत. त्यांना विसरला नसाल तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. एक सांगतो तुम्हाला, बाळासाहेब ज्या आक्रमकतेनं उभं राहायचे ना, ती आक्रमकता बाबरी पाडल्यानंतर येडे गबाळे पळून गेले होते. बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. म्हणजे आता विषय असा झाला आहे की, बाबरी कुणी पाडली? आम्हाला माहिती नाही. बाबरी आम्ही पाडलेली नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कुणी तर आम्ही नाही पाडली. सहा वर्षे केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिरासाठी कायदा करा.. कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला तर सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसै मागत आहे. पैसे कुणी दिले तर जनतेने दिले. पण आमचं नाव आलं पाहिजे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला होता.
नाना पटोलेंचीही भाजपच्या निधी संकलनावर टीका
विधानसभेत बोलताना पटोले यांनी भाजपवर एकावर एक आरोप केले. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत असताना आपण काल सभागृहात नव्हतो. पण काल भाजप नेत्यांनी जे मुद्दे मांडले त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पटोले यावेळी म्हणाले. सभागृहात पटोले बोलत असताना त्यांच्या अनेक शब्दांवर आणि भूमिकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.
सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं. सभागृहात मी राम मंदिराच्या नावानं सुरु असलेल्या निधी संकलनावर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. मग भाजपवालेच हा टोल जमा करत आहेत का? असा खोचक सवाल पटोले यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून ‘टोल वसुली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, फडणवीसांचंही प्रत्युत्तर
Satyajit Tambe criticizes BJP’s fund raising program for Ram Mandir