MLC Election 2022: मविआचा उमेदवार पडला तर ठाकरे सरकारच्या अस्तित्वावरच गंडांतर? मोहीत कंबोज यांचं सूचक ट्विट
भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सूचक ट्विट केलंय. त्यामुळे विधान परिषदेतही महाविकास आघाडीला झटका बसणार का? असं झालं तर महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच गंडातर येण्याची शक्यताही दबक्या आवाजात सुरु झालीय.
मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडलं. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार असल्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळाली. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. मात्र, राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) काही जादू होणार का? भाजप पुन्हा एकदा महाविकास आघाडीला झटका देणार की महाविकास आघाडी राज्यसभेचं उट्टे काढणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशावेळी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सूचक ट्विट केलंय. त्यामुळे विधान परिषदेतही महाविकास आघाडीला झटका बसणार का? असं झालं तर महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच गंडातर येण्याची शक्यताही दबक्या आवाजात सुरु झालीय.
‘विधान परिषद निवडणुकीसाठी आज 285 मतदान झाले. सरकार बनवण्यासाठी जादूई आकडा 143 आहे. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे सरकारला किती मतं पडणार ते पाहू.. आज उद्धव ठाकरे यांचं रिपोर्ट कार्ड येणार!’ असं सूचक ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.
285 Votes Casted For MLC Elections Today , 143 Is Magic Figure To Be In Government !
Let’s See How Many Votes Uddhav Thackeray Ji Sarkar Gets Today After 2.5 Years Of Running This Maha Vikas Aghadi Sarkar !
Today is Uddhav Ji Report Card !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 20, 2022
राणेंनीही ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा केला होता दावा
राज्यसभा निवडणुकीतील धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही. त्यांच्यावर आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी 145 मते लागतात. त्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती.
तिन जागा जिंकणार सांगत होते, काय झालं? राऊतही एका मताने आले. काठावर आले. वाचले आमच्या हातातून. आघाडीची मते त्यांना मिळायला हवी होती. ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी 145 मते लागतात. तुम्ही अल्पमतात आले आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या बाजूला व्हा, असं नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दहा वर्ष मागे नेला. तुमचे आठ आमदार फुटतात. तुमची विश्वासहार्यता आहे कुठे? तुमचे आमदार तुम्ही टिकवू शकत नाही आणि बढाया मारता. आमची मते पाहिली तर तुमच्यापेक्षा जास्त आहेत. तुम्ही अल्पमतात आला आहात, अशी टीकाही राणे यांनी केली होती.