Vidhan Parishad Election 2022 | पंकजा मुंडेंना यावेळीही डच्चू, भाजपकडून 5 उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा, उमा खापरे, श्रीकांत भारतीयना लॉटरी
Vidhan Parishad Election 2022 Pankaja Munde: भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.
मुंबईः विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर झाली असून त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपने नुकतीच पाच अधिकृत उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार भाजपतर्फे विधान परिषदेची निवडणूक लढवतील. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच बिहार या तिव्ही राज्यातील आगामी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 साठीची नावं जारी केली आहेत. यात महाराष्ट्रातील या पाच नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. या नावांत पंकजा मुंडेंचं नाव नसल्यामुळे पंकजा समर्थकांमध्ये नाराजी आहे. उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करेन, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. मात्र यंदाही त्यांची संधी हुकलेली दिसतेय.
राजकीय पुनर्वसनाची संधी हुकली
बीडमधून 2019 मधील आमदारकीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर नंतर पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. याआधीही राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र तेव्हाही पंकजांना संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्रातील विविध राजकीय कार्यक्रमांमधूनही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचं चित्र दिसत होतं. मुंबईत झालेला ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा, औरंगाबादेतला जलाक्रोश मोर्चा या नुकत्याच झालेल्या मोठ्या दोन भाजपच्या इव्हेंटमधूनही पंकजांची गैरहजेरी ठळकपणे दिसून आली. ओबीसी नेत्या असूनही त्या इथे सक्रिय दिसल्या नाहीत. याउलट भाजपचे राष्ट्रीय सचिवपद दिल्याने राष्ट्रीय पातळीवर राजकारणात त्या दिसून येत आहेत. आता विधान परिषदेच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील राजकारणाशी त्यांचा थेट संबंध येईल, अशी अपेक्षा पंकजांच्या समर्थकांना होती. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या नावाला समर्थन दिलं होतं. मात्र, ती अपेक्षा पूर्ण न झाल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया काय?
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनानंतरही पंकजांचं नाव डावलण्यात आलं. याविषय चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी याबाबत डिप्लोमेटिक प्रतिक्रिया दिली. हा सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. आम्ही कोरी पाकिटं असतो…
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एवं बिहार राज्यों में होने वाले आगामी विधान परिषद द्विवार्षिक चुनाव- 2022 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/cOzfHhaDQY
— BJP (@BJP4India) June 8, 2022
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.