कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेस उमेदवार आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर सतेज पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. राज्य पातळीवरील नेत्यांनी सामंजस्य दाखवलं आणि चर्चा केली त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीतील विरोध वैयक्तिक पातळीवर नसावा ही आमची भूमिका असल्याचं सतेज पाटील म्हणाले.
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) कोल्हापुरात सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर सतेज पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. राज्य पातळीवरील नेत्यांनी सामंजस्य दाखवलं आणि चर्चा केली त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीतील विरोध वैयक्तिक पातळीवर नसावा ही आमची भूमिका असल्याचं सतेज पाटील म्हणाले.
तर ‘सतेज पाटील निवडून येणार हे भाकीत मी आधीच केलं होतं. कारण त्यांनी चांगले काम केलं आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांचा हा विजय आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक आणि सदेत पाटील यांच्या गटातील कटुता कमी करावी अशी माझी इच्छा आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नेमकी काय चर्चा झाली हे भाजप आणि काँग्रेस नेत्यांना माहिती. प्राप्त परिस्थितीचा विचार करुन काँग्रेस आणि भाजपनं निर्णय घेतला असेल’, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.
कोल्हापूरची जागा बिनविरोध कशी निघाली? महाडिकांनी सांगितलं
‘राज्यात गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका होऊ शकल्या नव्हता. पुढे जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सलोखा रहावा. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा सुरु होती. भाजपसाठी मुंबईची जागा महत्वाची आहे, ती बिनविरोध झाली आहे. त्या बदल्यात कोल्हापूर करावी अशी वरिष्ठांची मागणी होती. तसंच धुळे-नंदुरबारची जागाही आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजप नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळे तिथे अमरिश पटेल यांचीही बिनविरोध करायची, म्हणजे दोन भाजपच्या जागा. आम्हा एक सीट जास्तीची पदरात पडली. भाजपच्या दोन जागा त्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी हा पक्षादेश आज झालेला आहे’.
‘दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी अशा घडामोडी झाल्या असल्याची माहिती दिली. या विभागात आम्ही भाजप आणि मित्रपक्ष यांच्यावतीनं अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. शौमिका अमल महाडिक यांचाही उमेदवारी अर्ज भरला होता. हे दोन्ही अर्ज आम्ही मागे घेतले आहेत. सदस्यसंख्या आमच्याकडे चांगली झालेली होती. पण पक्षादेशामुळे आम्ही याठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती भाजप नेते धनंजय महाडिक यांनी दिली.
अमल महाडिक काय म्हणाले?
मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला की निवडणूक लढ, मी तयार झालो. त्याच पद्धतीने आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांचा, तसंच पक्षाचा आदेश मान्य करुन माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे, असं मत अमल महाडिक यांनी व्यक्त केलं.
इतर बातम्या :