Vijay Shivtare | ‘मेला तर बाय इलेक्शन होईल, हे मी विसरलो, पण…’, काय म्हणाले विजय शिवतारे?
Vijay Shivtare | विजय शिवतारे हे बारामतीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली. पण तरीही शिवतारे मागे हटण्याची चिन्ह नाहीयत. विजय शिवतारे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अनेक मुद्दे मांडले. ."पवारसाहेबांनी 41 वर्ष आम्हाला परत परत मतदान करायला लावलं. बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का?" असा सवाल त्यांनी केला.
बारामती : “बारामतीमधल्या मतदारांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांना भेटणं, विश्वासात घेणं, मुख्यमंत्र्यांच्या भावना त्यांना कळवणं. या सगळ्यांचा, जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे” असं विजय शिवतारे म्हणाले. “बारामतीमध्ये 6 लाख 86 हजार पवारांच्या बाजूने मत आहेत, त्याचवेळी 5 लाख 50 हजार विरोधी मत सुद्धा आहेत. ज्यांना पवारांना मतदान करायची इच्छा नाही, त्यांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे” असं विजय शिवतारे म्हणाले. विजय शिवतारे हे बारामतीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली. पण तरीही शिवतारे मागे हटण्याची चिन्ह नाहीयत.
“महाविकास आघाडीच सरकार असताना भोरमध्ये सगळी काम ठप्प झालेली. कारण निधीवाटप चुकीच होतं. संग्राम थोपटे काँग्रेसचे आहेत. भोरच्या जनतेसाठी मुख्यमंत्र्यांना सांगून विकास कामांवरची स्थगिती उठवली. लोकांची काम झाली पाहिजेत” असं विजय शिवतारे म्हणाले. “पवारसाहेबांनी 41 वर्ष आम्हाला परत परत मतदान करायला लावलं. बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का?. पाच मतदारसंघातून पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का?. बारामतीमध्ये हजारो आडनाव आहेत, ते का नको? आम्ही परत पवारांना का मतदान करायच? आम्हाला काय दिलं?. सर्व प्रकल्प बारामती शहरात आणले. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात प्यायला पाणी नाही. कसला विकास केला तुम्ही?. जे यांना 50 वर्षात जमलं नाही, ते विजय शिवतारे करुन दाखवेल. 2 लाख लोकांना पाणी देईन. पाण्याच फेर नियोजन करेन. नीरेच पाणी वाहून जातय. करा नदीच पात्र डीप आहे. तिथे पाणी साठवता येऊ शकत” असं विजय शिवतारे म्हणाले.
‘मरतोय तर कशाला लढतोय?’
“माझी अजितदादांवर नाराजी नाही. माझ्या मतदार संघातील लोकांची नाराजी आहे. 2019 च्या सांगता सभेत ते म्हणालेले की, मरतोय तर कशाला लढतोय?. मेला तर पुन्हा बाय इलेक्शन होईल. मी हे विसरलोय, नियती त्यांना पाहून घेईल. मतदारसंघातील स्वाभिमान मतदार मात्र हे विसरणार नाही. मला त्यांनी फोन करावा, अशी माझी इच्छा नाही” असं विजय शिवतारे म्हणाले. “पवार ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीने इतरांना दाबून ठेवलेलं आहे. इतरांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्या विरोधात माझा लढा आहे” असं विजय शिवतारे म्हणाले.