‘चंद्रकांत पाटील यांनी आता बोलघेवडेपणा बंद करावा’, विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारसमोर भाजप उमेदवाराचा निभाव लागला नाही. त्यावर हिंमत असेल तर एकएकटे लढा, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दिलं आहे. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणलाय.
मुंबई: ‘विधान परिषदेच्या 6 जागाही जिंकू, पुणे तर वनवेच’, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पण पुणेच नाही तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला हाणलाय. चंद्रकांत दादांनी आता बोलघेवडेपणा बंद करावा, असा सल्लाच वडेट्टीवार यांनी पाटलांना दिलीय.(Vijay Vadettiwar criticize Chandrakant patil)
“आपण काय बोलतो याचा काही ताळमेळ नाही, चंद्रकांत पाटील यांनी बोलघेवडेपणा बंद करावा. भाजपनं यापूर्वी कधी एकत्रित निवडणुका लढवल्या नाहीत का? आयजीच्या जीवावर बायजी उदार, असा प्रकार भाजपने करु नये”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारसमोर भाजप उमेदवाराचा निभाव लागला नाही. त्यावर हिंमत असेल तर एकएकटे लढा, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दिलं आहे. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला हाणलाय.
विजय वडेट्टीवार यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले. राज्यावर कोरोनाचं संकट असतानाही आम्ही फक्त बोलघेवडेपणा न करता शांतपणे काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेमुळंच हा विजय मिळाल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. भाजप ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम करत होता. आम्ही ओबीसींसाठी चांगलं काम करत आहोत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
कोरोना संकटात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सरकारने कार्य केले ,त्याला नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी दिलेली ही पावती आहे . https://t.co/0zslnBe4xN
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 4, 2020
गटबाजीमुळे भाजपचा पराभव- वडेट्टीवार
भाजपमध्ये नेहमीच अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव याच गटबाजीचा परिणाम आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपमध्ये एकमेकांचं तिकीट कापण्याचे प्रयत्न सुरु असतात. हे सर् कोण करतं हे त्यांच्या पक्षातील सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या पराभवानंतर भाजपला नेतृत्व बदलाची संधी असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
हिंमत असेल तर एकटे लढा- चंद्रकांत पाटील
पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
संबंधित बातम्या:
जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?
Vijay Vadettiwar criticize Chandrakant patil