तर घरोघरी जाऊन ओबीसींचा इम्पिरीकल डाटा गोळा करावा लागेल: विजय वडेट्टीवार

| Updated on: Aug 03, 2021 | 2:04 PM

केंद्र सरकार जर ओबीसींच्या हक्काचा डाटा देत नसेल तर घरोघरी जाऊन डेटा गोळा करावा लागेल. (vijay wadettiwar)

तर घरोघरी जाऊन ओबीसींचा इम्पिरीकल डाटा गोळा करावा लागेल: विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us on

मुंबई: केंद्र सरकार जर ओबीसींच्या हक्काचा डाटा देत नसेल तर घरोघरी जाऊन डेटा गोळा करावा लागेल. मात्र ही वेळ कुणी आणली?, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (vijay wadettiwar attacks bjp over obc reservation issue)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला आहे. ओबीसी आरक्षणासाठी जनगणनेचे काम आयोगाकडे दिले आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि संबधित विभागाकडे बैठक घेवून योग्य ते मनुष्यबळ उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केली आहे. केंद्राकडे उपलब्ध असलेला इंपोरीअल डाटा मिळवून देण्याची कोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे. जर केंद्र सरकार ओबीसींच्या हक्काचा डाटा देत नसेल तर घरोघरी जाऊन डेटा गोळा करावा लागेल. मात्र ही वेळ कुणी आणली?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

तिसरी लाट मोठी

तिसरी लाट मोठी असेल असं भाकीत आहे. तसेच आताची स्थितीही सर्वकाही सुरू करावं अशी नाही. त्यामुळे मोठ्या शहरात शिथिलता देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं वडेट्टीवार म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.

बावनकुळेंची टीका

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच तसा आरोप केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असं वंजारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?, असा सवाल करतानाच ओबीसींचा एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, असं आव्हानच बावनकुळे यांनी दिलं आहे.

डिसेंबरपर्यंत डाटा गोळा करा

राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्यात ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारने लवकर डाटा गोळा करावा. डिसेंबरपर्यॅत इम्पेरीकल डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी जे काही करायचं असेल ते करा. पण ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करू नका. येणारी 2022ची निवडणूक ही ओबीसी आरक्षणानुसारच झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ते सरकारने करून दाखवावं, असंही ते म्हणाले. (vijay wadettiwar attacks bjp over obc reservation issue)

 

संबंधित बातम्या:

शिवसैनिकांनी योग्यच केलं; अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचं राऊतांकडून समर्थन

सांगली-कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणाले, कठोर निर्णय घ्यावेच लागतील, उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार?

पुणेकरांनो थोडी कळ सोसा; विजय वडेट्टीवार यांचं आवाहन

(vijay wadettiwar attacks bjp over obc reservation issue)