अशोक चव्हाणांच्या कर्तृत्वामुळे मराठा समाजावर ही वेळ, विनायक मेटेंची टीका
काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता औरंगाबादचं संभाजीनगर करा, असं आवाहन विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
मुंबई : “उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीय. त्यांच्या कर्तृत्वामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे. आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नये”, अशी जोरदार टीका आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. (Vinayak Mete Press Conference over Maratha reservation And rename Of Aurangabad)
“मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही याबाबत समाजात मोठी अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नये. मराठा आरक्षणाच्या संबंधित सर्व संघटना आणि नेत्यांची बैठक बोलावण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही ही विनंती मान्य केली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत बैठक बोलावली जाईल”, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं मेटे म्हणाले.
“उपसमितीने आणि सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी नेमकी काय रणनिती आहे, हे समाजाला सांगावं, असंही मेटे म्हणाले. मराठा आरक्षणाला होत असलेला विलंब आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने यापुढची पावले टाकावीत”, असं मेटे म्हणाले.
सरकारमधील मंत्रीच जातीयवादी भूमिका घेत आहेत. जे नेते मंत्री उठता बसता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात त्यांच्याकडूनच जातीयवादी भूमिका घेतली जाते, असं म्हणत मेटे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर निशाणा साधला. सरकारमधील काही मंत्री समाजा-समाजामध्ये भांडणं कशी लागतील हे पाहत असल्याची टीका मेटे यांनी केली. तसंच अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष समज द्यावी, असंही मेटे म्हणाले.
“जर सरकारमध्ये राहायचं असेल तर सामाजिक ऐक्य जोपासावं नाहीतर दोन समाजामध्ये वाद होतील अशी वक्तव्य करायची असतील तर सरळ मंत्रीमंडळातून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना सांगायला पाहिजे”, असं मेटे म्हणाले.
काँग्रेसच्या विरोधाला जुमानू नका, औरंगाबाद नामांतर संभाजीनगर करा
“औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची चांगली संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात आलेली आहे. त्यांनी ती दवडता कामा नये. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात खूप प्रयत्न केले होते. जर यामध्ये काही अडचणी असतील तर त्या मुख्यमंत्र्यांनी दूर कराव्यात. त्यांच्या सरकार मधील काही पक्षांनी त्यांची मतं अबाधित ठेवण्यासाठी जरी विरोध केला तरी त्यांनी त्यांच्या विरोधाकडे लक्ष देऊ नये”, असं आवाहनही मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. (Vinayak Mete Press Conference over Maratha reservation And rename Of Aurangabad)
हे ही वाचा
Gold Price Today : लग्नसराईमुळे सोन्याचे भाव कडाडले, लवकर सोने 47 हजार रुपयांवर येणार?
घरच्या ‘होम मिनिस्टरसाठी’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी, तीही चक्क येरवडा कारागृहातून