Refinery Project : केंद्र आणि राज्यातील राज्यकर्ते रिफायनरीचे दलाल; विनायक राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 21, 2022 | 12:36 PM

Refinery Project : केंद्रातील आणि राज्यातील राज्यकर्ते हे रिफायनरीचे समर्थक आणि दलाल आहेत. रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून 224 गुजराती आणि मारवाडींनी या परिसरात जमिनी विकत घेतल्या होत्या. हे मी दाखवून दिलं आहे.

Refinery Project : केंद्र आणि राज्यातील राज्यकर्ते रिफायनरीचे दलाल; विनायक राऊत यांचा हल्लाबोल
खा. विनायक राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर : रत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरीचा (refinery project) सर्व्हे सुरू झाला आहे. रिफायनरीच्या या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी भाजपचे माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) बारसू गावात आले होते. यावेळी त्यांना आंदोलकांनी घेराव घालून जाब विचारला. जोपर्यंत रिफायनरी प्रकल्प रद्द होणार नाही, तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला. या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केल्याने बारसूतील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल आहे. ते रिफायनरीचे समर्थक आहेत. त्यामुळे बारसूत रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा घाट घालत आहे. त्याला आमचा कडाडून विरोध असून ग्रामस्थांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. बारसूसह आजूबाजूच्या सहा गावात 100 टक्के ग्रामस्थांचा विरोध आहे. पण रिफायनरीचे दलाल त्या ठिकाणी जात आहेत. सरकारच रिफायनरीच्या दलालांचं आहे. त्यामुळे आंदोलकांचं प्रामाणिकपणे म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये. सरकारी धाकदपटशा दाखवला जात आहे. पोलिसांची दादागिरी सुरू आहे. 400 लोकांना तडीपारीच्या नोटिशी दिल्या आहेत. सरकार आणि रिफायनरीच्या दलालांकडून हा अन्याय सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, असं विनायक राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नांगर फिरवून प्रकल्प राबवता येणार नाही

स्थानिकांच्या घरादारावर नांगर फिरवून हा प्रकल्प राबवता येणार नाही. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थांसोबत आहोत. त्यांचं म्हणणं ऐका. त्यांच्या मागण्या समजून घ्या. पण सरकारच रिफायनरीवाल्यांचं आहे. त्यामुळे त्यांचं ऐकून घेतलं जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

रिफायरी भूमाफियांच्या हिताची

केंद्रातील आणि राज्यातील राज्यकर्ते हे रिफायनरीचे समर्थक आणि दलाल आहेत. रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून 224 गुजराती आणि मारवाडींनी या परिसरात जमिनी विकत घेतल्या होत्या. हे मी दाखवून दिलं आहे. जनतेच्या हितासाठी ही रिफायनरी नाही. ती भूमाफियांच्या हिताची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सामंत आमच्या पक्षात नाही

उदय सामंत हे आमच्या पक्षाचे नाहीत. ते गद्दार आहेत. त्यांनी उद्योग मंत्री म्हणून लोकांचं ऐकून घ्यावं. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य कराव्यात, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.