अब्दुल सत्तारांनंतर संजय राठोडांनाही विरोधक घेरणार! प्रकरण तेच, आता कोणत्या गायरान जमीन विक्रीचा आरोप?
महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील जमीन खासगा व्यक्तीला विक्री केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
नागपूरः कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हेदेखील आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना संजय राठोड यांनी 29 जुलै 2019 रोजी गायरान जमीन विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दिवशी खासगी व्यक्तीला राठोड यांनी जमीन विकल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आजच्या नागपूर अधिवेशनात या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.
संजय राठोडांवरचे आरोप काय?
महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील जमीन खासगा व्यक्तीला विक्री केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी गायरान जमीन विक्री करण्यास मनाई केली आहे.
वाशिमचे जिल्हाधिकारी आणि मंगळूरपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असे लेखी आदेश एका अर्जावर दिले होते.
मात्र संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश रद्द ठरवून पाच एकर जागा नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. माहितीच्या अधिकाराच ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज विरोधक संजय राठोड यांनाही घेरण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार आज स्पष्टीकरण देणार?
दरम्यान, अब्दुल सत्तार हेदेखील महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप करण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेश डावल्याने सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या संपूर्ण प्रकरणावर कालपर्यंत नॉट रिचेबल असलेले अब्दुल सत्तार आज प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.