Video : ‘बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांनाही वंदन करणार आणि धर्मवीर…’ एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
Maharashtra Political Crisis : गुवाहाटीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बंडखोर आमदार तळ ठोकून होते.
गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये बंडाच्या नवव्या दिवशी अखेर शिंदे गटातील (Eknath Shinde group News) सगळे आमदार रेडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर पडले. त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया टिपण्यासाठी माध्यमांचे कॅमेरे आणि माईक सज्ज होतेच. सर्व माध्यम प्रतिनिधींशी बोलताना यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुंबईत गुरुवारी पोहोचणार असल्याचं म्हटलं. तसंच आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मृतीस्थळाला वंदन करणार आहोत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनाही वंदन करु आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनाही वंदन करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं. आपल्याकडे बहुमत चाचणीसाठीचं (Uddhav Thackeray Floor test) संख्याबळ असल्याचं विधान त्यांनी यावेळी केलंय. आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही, असं ते म्हणाले आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, आणि धर्मवीर आनंद दीघेसाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना आहे, असं विधान त्यांनी यावेळी केलंय.
पाहा व्हिडीओ :
नेमकं काय म्हणाले शिंदे?
यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय, की…
मुंबई आम्ही उद्या पोहोचणार. आमच्यासोबत 50 लोक आहेत. आमच्याकडे संख्याबळापेक्षाही जास्त संख्या आहे. आम्हाला फ्लोअर टेस्टची चिंता नाही. प्रक्रियेला आम्ही पास होणार आहोत. आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. सत्तेत नंबर फार महत्त्वाचे असतात. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांनांही वंदन करणार आणि धर्मवीर आनंद दीघे साहेबांना देखील वंदन करणार. ही शिवसेना आहे! ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे…ही धर्मवीर दीघेंचा विचार पुढे नेणारी शिवसेना आहे. या राज्याचा विकास करण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडलेला आहे.
गुवाहाटीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बंडखोर आमदार तळ ठोकून होते. त्याआधी बंडाचा पहिलाच दिवस आमदारांनी सूरतमध्ये घालवला होता. आता सूरत, गुवाहाटीनंतर बंडखोर आमदार हे गोव्याला येणार आहेत. तिथे आज संध्याकाळी ते पोहोचल्यानंतर उद्या मुंबईत दाखल होतील.
उद्या ठाकरेंची अग्निपरीक्षा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष अधिवेशन बोलण्याचे आदेश दिले आहेत. या अधिवेशनातून बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान ठाकरे सरकारपुढे आहे. शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. तर उद्याची बहुमत चाचणी टाळण्यासाठी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.
कसं आहे राज्यातील संख्याबळ?
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |